आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी ठाणे आणि दिवा यांना जोडणाऱ्या 5व्या आणि 6व्या रेल्वे मार्गाचे लोकार्पण करणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांची खोळंब्यातून सुटका होणार आहे. नरेंद्र मोदी आज 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून या मार्गाचे लोकार्पण करणार आहे. अशी माहिती पंतप्रधान कार्यालयाने दिली आहे.
पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी मुंबई उपनगरीय रेल्वेच्या दोन उपनगरीय गाड्यांना हिरवा झेंडा दाखवणार आहेत. यानंतर त्यांचे भाषणही यावेळी होणार आहे. 18 फेब्रुवारीला दुपारी 4.30 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे ठाणे आणि दिवा यांना जोडणारे दोन अतिरिक्त रेल्वे मार्ग पंतप्रधान मोदी राष्ट्राला समर्पित करतील. असे पंतप्रधान कार्यालयाने म्हटले आहे.
ठाणे-दिवा या भागातील दोन रेल्वे मार्गाच्या उद्घाटनासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे मुंबईत येणार आहेत. यादरम्यान ते मुंबई लोकलने देखील प्रवास करणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आपले भाषण देणार आहेत. आगामी काळात मुंबईसह राज्यातील अनेक महानगर पालिकांची निवडणूक होणार आहे. त्यामुळे मोदी आजच्या भाषणात महाराष्ट्रासाठी काय़ घोषणा करतात हे पाहणे देखील महत्वाचे आहे.
मध्य रेल्वेसाठी कल्याण जंक्शन हे मुख्य आहे. देशातील उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून येणारी वाहतूक कल्याण जंक्शनला जोडली जाते. पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने रेल्वेगाड्या जातात. कल्याण ते सीएसटीएम दरम्यानच्या चार रेल्वे मार्गांपैकी दोन मार्ग धीम्या लोकलसाठी आणि दोन मार्ग जलद लोकल, मेल एक्सप्रेस आणि मालगाड्यांसाठी वापरण्यात येत होते. पण उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या मेल, एक्स्प्रेस ट्रेन वेगळ्या करण्यासाठी दोन अतिरिक्त मार्गांचे म्हणजे 5 व्या आणि 6 व्या मार्गांची योजना आखण्यात आली होती. त्याचे आज पंतप्रधान मोदी लोकार्पण करणार आहेत.
नवीन दोन मार्गामुळे ठाणे ते दिवा दरम्यानचा मध्य रेल्वेचा खोळंबा आता कायमचा दूर होणार आहे. यामुळे कसारा, आसनगाव आणि कर्जत, बदलापूरहून येणाऱ्या उपनगरीय रेल्वे प्रवाशांचा मुंबईला जाण्याचा वेळ आणखी कमी होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.