आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

राज्य सरकारचा महत्त्वाचा निर्णय:शाळा प्रवेशासाठी 31 डिसेंबरला असलेले वय गृहीत धरणार; इयत्ता पहिलीसाठी सहा वर्षे, तर प्ले ग्रुपसाठी तीन वर्षांची अट

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2021-22 या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार अंमलबजावणी

शाळा प्रवेशाच्या किमान वयामध्ये राज्य सरकारने तीन महिन्यांची शिथिलता दिली आहे. इयत्ता पहिलीच्या प्रवेशासाठीच्या मानीव दिनांकात वाढ केली असून प्ले ग्रुपच्या प्रवेशाचे वय आता तीन वर्षे निश्चित केले आहे. तसेच महाविद्यालये आणि विद्यापीठाचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना यापुढे १०० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आली आहे.

राज्यात राज्य मंडळ, आयबी, सीबीएसई, आयसीएससी अशा विविध मंडळांच्या शाळा आहेत. त्यातील प्रवेशासंदर्भात वयाचे निकष वेगवेगळे होते. प्ले ग्रुपच्या प्रवेशासंदर्भात राज्य सरकारचे निश्चित असे निकष नव्हते. २०१० मध्ये शाळा प्रवेशाच्या वयाची तरतूद निश्चित केली. त्या वेळी वयाचा ३१ जुलै हा मानीव दिनांक होता.

त्यानंतर २०१७ मध्ये मानीव दिनांक ३० सप्टेंबर करण्यात आला. तसेच शाळा प्रवेशाच्या किमान वयामध्ये १५ दिवस शिथिलता देण्याचा अधिकार मुख्याध्यापकांना देण्यात आला होता. मात्र, प्ले ग्रुपच्या प्रवेशासंदर्भात राज्यात वयाची निश्चिती नव्हती. त्यामुळे प्रवेश देण्यात वयासंदर्भात एकसूत्रता नव्हती.

पहिली प्रवेशाच्या वयात शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. त्यानुसार प्राथमिक विभाग संचालकांच्या अध्यक्षतेखाली शालेय शिक्षण विभागाने एकसदस्यीय समिती नेमली होती. समितीच्या अहवालातील शिफारशीप्रमाणे शाळा प्रवेशाचा मानीव दिनांक ३१ डिसेंबर करण्यात आला आहे. तसा शासन निर्णय शुक्रवारी जारी करण्यात आला. या निर्णयाची अंमलबजावणी पुढच्या वर्षाच्या म्हणजे २०२१-२२ या शैक्षणिक वर्षापासून करण्यात येणार आहे.

पहिली प्रवेशाचे वय : ६+ मानीव दिनांक ३१ डिसेंबर. अंमलबजावणी वर्ष २०२१-२२.

प्ले ग्रुप/ नर्सरी (पहिलीपूर्वीचा ितसरा वर्ग) प्रवेश वय : ३+ मानीव दिनांक ३१ डिसेंबर. २०२१-२२ पासून लागू

मानीव दिनांक

३१ सप्टेंबर हा मानीव दिनांक असल्याने शाळा प्रवेशावेळी म्हणजे जूनमध्ये विद्यार्थी ५ वर्षे ९ महिन्यांचा असणे आवश्यक असे. मात्र, आता ३१ डिसेंबर मानीव दिनांक केल्याने प्रवेशावेळी वय ५ वर्षे ६ महिने असले तरी चालेल.

१०० टक्के हजेरी

कोरोनामुळे कार्यालयीन कर्मचाऱ्यांना उपस्थितीत सूट होती. मात्र, पदवी वर्गाच्या शेवटच्या वर्षाच्या परीक्षा ३१ आॅक्टोबरपूर्वी होणार असल्याने अकृषक विद्यापीठे, अभिमत विद्यापीठे, स्वयंअर्थसहाय्यित विद्यापीठे व संलग्नित सर्व महाविद्यालयांतील शिक्षक व कर्मचाऱ्यांसाठी उपस्थिती १००% करण्यात आली आहे. त्याचा जीआरही निघाला आहे.