आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेती:शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची आवश्यकता : उद्धव ठाकरे

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुख्यमंत्र्यांचा कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी संवाद

कृषी विद्यापीठांनी महाराष्ट्राची ओळख दर्शवणारी पिके विकसित करावी. ज्याला बाजारपेठ आहे अशी पिके घ्यावीत. विद्यापीठातील संशोधनांमुळे शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपून त्यांच्या जीवनात बदल झाला पाहिजे, अशी अपेक्षा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली त्यांनी आज राज्यातील कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंशी व्हीडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधला.

मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील सर्व कृषी विद्यापीठे चांगले काम करत आहेत. परंतू त्यांच्या कामातून भविष्यात शेती आणि शेतकऱ्याला आणखी पुढे कसे नेता येईल याचा मार्ग दिसला पाहिजे. शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनातील अनिश्चितता संपवण्याची गरज आहे. संघटित शेती आणि संघटित शेतकरी ही संकल्पना राबवून जे विकले जाईल तेच पिकवायची गरज असून शेतकऱ्यांना संघटित करतांना विभागवार निश्चित केलेल्या दर्जाचीच पिके पिकतील, ती बाजारपेठेत विकली जातील यादृष्टीने शेतकऱ्यांशी संवाद साधून मार्गदर्शन करावे. अशा उत्पादनांना, शेतमालाला बाजारपेठ उपलब्ध व्हावी यासाठी त्याचे मार्केटिंग कसे करता येईल याचाही विचार व्हावा.

दूध, कांदा, कापूस अशा वेगवेगळ्या पिकांबाबतीत असलेली अनिश्चितता संपवायची आहे यासाठी प्रत्येक पिकाचे, वाणाचे वेगळेपण ओळखून पिके घ्यावीत. त्यासाठी महाराष्ट्राची विभागवार मांडणी करून फळ, धान्य, प्रक्रिया उद्योग यांची निश्चिती करावी, त्यांचा दर्जा राखताना आपली उत्पादने जागतिक दर्जाची आहेत का, याचा अभ्यास करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी केली. यावेळी कृषिमंत्री दादाजी भुसे, राज्यमंत्री डॉ.विश्वजित कदम, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्री कार्यालयातील प्रधान सल्लागार अजोय मेहता, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले, महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. के.पी विश्वनाथा, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय सावंत, डॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.व्ही.एम.भाले, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ कुलगुरू डॉ.अशोक ढवण यावेळी उपस्थित होते.

यावेळी चारही कृषि विद्यापीठांच्या कुलगुरूंनी संशोधन, बियाणे मागणी व पुरवठा, विद्यापीठांनी संशोधन केलेले नवीन वाण, परिसर मुलाखती आदी विषयांवर सादरीकरण केले.

सेंद्रिय शेतीकडे ओढा - डॉ.विश्वजित कदम

राज्यात आधुनिक शेती आणि सेंद्रिय शेतीला चालना मिळण्यासाठी विद्यापीठांनी प्रयत्न करण्याचे आवाहन राज्यमंत्री डॉ.कदम यांनी केले. कमी शेती असलेल्या शेतकऱ्यांना स्वयंपूर्ण बनविण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे असून कृषी विद्यापीठातील अभ्यासक्रम हा बदलत्या काळाशी सुसंगत असावा, असे मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितले. हवामान बदलांवर आधारीत वाण विकसीत करण गरजेचे असून त्यासाठी प्रत्येक विद्यापीठात एक स्वतंत्र कक्ष तयार करावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे यांनी यावेळी मांडली. वन शेतीला चालना देण्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

जे विकेल ते पिकेल संकल्पना प्रत्यक्षात आणणार - दादाजी भुसे

कृषीमंत्री भुसे म्हणाले की, विद्यापीठाचे संशोधन शेतकऱ्यांच्या बांधावर नेण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. जे विकेल ते पिकेल ही संकल्पना आता प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. विद्यापीठांनी विविध वाणाचे संशोधन करतांना शेतीसाठी उपयुक्त ठरणाऱ्या लहान यंत्रांचे संशोधन करून ते शेतकऱ्यांना उपलब्ध होतील यासाठी प्रयत्न करणे आवश्यक अाहे.

बातम्या आणखी आहेत...