आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा''स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला. शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्रीपद हडपायचे होते. भाजप-ईडी युतीने त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग’ दाखवला. तेव्हा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला वगैरे सगळी बकवास आहे. अशा प्रखर शब्दात शिवसेनने मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर जोरदार प्रहार केला.
शिंदे कसे ते राज्याला कळतेय
शिवसेनेने टीका केली की, मुख्यमंत्री शिंदे म्हणजे काय विचित्र मनुष्यप्राणी आहे हे आता महाराष्ट्राला कळू लागले आहे. अर्थात महाराष्ट्राला कळत असले तरी भाजपास वळायला वेळ लागेल हे मात्र खरेच. अशा या मुख्यमंत्र्यांनी एक महाराष्ट्र दौरा काढला व त्यांच्या समर्थक आमदारांच्या भागात ते तुताऱ्या फुंकून आले. मुख्यमंत्र्यांची या दौऱ्यातील काही विधाने गमतीची आहेत. त्यांच्या तोंडी क्रांती, उठाव असे शब्द येऊ लागले आहेत.
शिंदे सरकार औटघटक्याचे ठरेल
शिवसेनेने टीका करताना म्हटले की, औरंगाबादला मुक्कामी मुख्यमंत्री म्हणतात, ‘‘ईडीला घाबरून कुणी आमच्याकडे येऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितले की, ‘‘राज्यात आम्ही नवे सरकार बनवले आहे. एवढे आमदार, एवढे खासदार आमच्याकडे आले, त्यातील कोणीही ईडी किंवा इतर तपास यंत्रणांच्या कारवायांना घाबरून आमच्याकडे आलेले नाही. विनंती आहे की, ईडीच्या कारवाईला घाबरून कोणीही आमच्याकडे येऊ नका. तसेच भाजपकडेही जाऊ नका.’’ मुख्यमंत्र्यांना 40 आमदारांचे समर्थन आहे. मुख्यमंत्र्यांचे हे विधान समर्थक आमदारांनी मनावर घेतले तर शिंदेशाही खऱ्या अर्थाने औटघटकेची ठरेल.
सेनापती इडीला शरण गेले
काही क्षणात त्यांचा तंबू रिकामा होईल. कारण ‘गाव का बच्चा बच्चा जानता है’ की, शिंदे गटातील निम्मे लोक ईडीला घाबरूनच विश्वासघाताच्या मार्गाने गेले. स्वतः शिंदे यांची तीच कहाणी आहे. शिंदे यांचे सचिव व इतर मित्रमंडळींच्या नाडय़ा ‘ईडी’ने आवळल्यावरच त्यांनी सध्याचा उठाव आणि ‘क्रांती’ केली हेच सत्य आहे.
स्वतः मुख्यमंत्री म्हणजे चाळीस आमदारांचा सेनापतीच ‘ईडी’विरुद्ध न लढता शरण गेला व दिल्लीश्वरांचा मांडलिक झाला. शिंदे औरंगाबादेत म्हणाले, ‘राज्यात आम्ही नवीन सरकार बनवले आहे.’ शिंदे हे कोणत्या सरकारच्या बाबतीत बोलत आहेत? राज्यात शिंदे-फडणवीसांनी फक्त शपथ घेतली. त्याला एक महिना उलटूनही हललेला नाही. शिंदे व फडणवीसांची जोडी म्हणजे सरकार असे कोणाला वाटत असेल तर ते खरोखर विचित्र मनुष्यप्राणी आहेत. ‘ना घर का ना घाट का’ अशीच या लोकांची अवस्था झाली आहे.
शिंदे बाराच्या भावात जातील
शिवसेनेने टीका करताना नमूद केले की, शिंदे गटाचा काळ किती कठीण आला आहे हे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर स्पष्ट होईल. ‘ईडी’च्या भीतीनेच लोक सैरावैरा पळू लागले व त्याच भयग्रस्त अवस्थेत ते शिंदे यांच्या गलबतात चढले. ते गलबतही आता भरकटले आहे. त्यांच्या विचारांना दिशा नाही व कृतीला कर्तृत्वाची जोड नाही. शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव आपण हाणून पाडल्याची भाषा शिंदे यांनी सिल्लोडच्या मेळाव्यात केली. सिल्लोडची भूमी त्यांनी क्रांतीची ठिणगी टाकण्यासाठी निवडली, पण सिल्लोडचे समर्थक आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर विश्वास ठेवणारे बाराच्याच भावात जातात. सत्तार यांनी बाराच्या भावात घालण्यासाठी या वेळी मुख्यमंत्र्यांचीच निवड केली हे कौतुकास्पद आहे. शिंदे यांनी राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला हे विधान तर्कसंगत नाही. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्रीपद शिंदे यांना मिळाले असते तर राष्ट्रवादीचे गुणगाण करताना हे महाशय दिसले असते.
शिंदेंना सीएमपद हडपायचे होते
शिवसेनेने टीका केली की, शिंदे यांना येनकेन मार्गाने मुख्यमंत्रीपद हडपायचे होते. भाजप-ईडी युतीने त्यांना त्याकामी ‘समृद्धीचा मार्ग’ दाखवला. तेव्हा राष्ट्रवादीचा डाव हाणून पाडला वगैरे सगळी बकवास आहे. पुन्हा ‘गेल्या अडीच वर्षांत बाळासाहेबांच्या विचाराशी प्रतारणा झाली. त्यांच्या विरोधी भूमिका घेण्यात आली,’ असा ‘दिव्य दाहक’ विचारही शिंदे यांनी मांडला. हिंदुत्व हा तर महत्त्वाचा विचार आहेच, पण महाराष्ट्राचा स्वाभिमान व मराठी अस्मितेच्या रक्षणासाठीच शिवसेनेची स्थापना बाळासाहेबांनी केली. त्याच मराठी अस्मितेवर व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर अपमानाच्या गुळण्या टाकण्याचे काम राज्यपाल महोदयांनी केले. पण शिंदे यांनी त्यावर गप्प बसणे पसंत केले. महाराष्ट्राचा अपमान सहन करा व शांत बसा हा तर बाळासाहेबांचा विचार कधीच नव्हता. महाराष्ट्राच्या स्वाभिमानास कुणी नख लावत असेल तर चवताळून उठा, अपमान करणाऱ्याच्या नरडीचा घोट घ्या, हाच बाळासाहेबांचा विचार आहे व मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर असताना शिंदे यांनी त्या विचारांशी प्रतारणा केली. हे खरे की खोटे? शिवसेना संपविण्याचा राष्ट्रवादीचा डाव त्यांनी हाणून पाडला. मग महाराष्ट्राच्या बदनामीचा, मराठी माणसाला खतम करण्याचा, महाराष्ट्रातील हिंदू समाजात फूट पाडण्याचा राज्यपाली डाव शिंदे का बरे हाणून पाडू शकले नाहीत? मी मुलाखत दिली तर भूकंप होईल, असा टोला त्यांनी मारला. मग त्यांना कोणी अडवले आहे? धर्मवीरांचे वंशज केदार दिघे यांनी त्यावर शिंदे यांना चांगलेच हाणले आहे.
शिंदे समर्थकांवर ईडीची तलवार
शिवसेनेने टीका केली की, मुळात भाजपच्या मनात बऱ्याच काळापासून शिवसेना संपवण्याचा डाव होता. तो डाव तडीस जात नव्हता. शेवटी शिंदे व त्यांच्या समर्थकांवर ईडी वगैरेची तलवार लावून त्यांनी शिवसेना संपविण्याचा डाव टाकलाच. पण आता तोही डाव उलटताना दिसत आहे. शिवसेना नवी उभारी घेत आहे. ती वेगाने आकाशाला गवसणी घालेल व शिवसेना संपवू पाहणाऱ्यांच्या गोवऱ्या सोनापुरात रचल्या जातील याविषयी आमच्या मनात तरी शंका नाही. ‘ईडी’ला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येऊ नका असे सांगणे म्हणजे दोघांचेही दुकान कायमचे बंद करण्यासारखे आहे. कारण चोरीच्या मालावर सुरू केलेले दुकान फार काळ चालत नाही!
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.