आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त १२ जागांसाठी तिन्ही पक्षांना प्रत्येकी ४ जागांच्या सूत्राऐवजी शिवसेना ५, राष्ट्रवादी ४ आणि काँग्रेसला ३ जागा देण्याचा नवा फॉर्म्युला निश्चित झाल्याचे वृत्त आहे. मात्र पाच जागांची मागणी करूनही केवळ ३ जागा पदरी पडत असल्याने नाराज काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांनी गुरुवारी बैठक घेतली. या वेळी सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयात काँग्रेसी मंत्र्यांना सहभागी करून घेत जात नसल्यानेही तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. ही बैठक काँग्रेसचे मंत्री सुनील केदार यांच्या निवासस्थानी पार पडली. या बैठकीला काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब थोरात, अशोक चव्हाण, वर्षा गायकवाड, सतेज पाटील, नाना पटोले, विजय वडेट्टीवार हे मंत्री उपस्थित होते. बैठकीनंतर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात म्हणाले की, ‘आघाडी सरकारमध्ये काही प्रश्न नक्कीच आहेत. सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेत काँग्रेसला बरोबरीचे स्थान मिळायला पाहिजे अशी आमची मागणी आहे. आमच्या मंत्र्यांची नाराजी मुख्यमंत्र्यांच्या कानावर लवकरच भेटून घालणार आहोत. महाविकास आघाडीचे सरकार चालवताना निर्णय प्रक्रियेत स्थान मिळत नसल्याचं काँग्रेसचे म्हणणे आहे. कोरोनाच्या संकटात घेण्यात येणारे निर्णय तिन्ही पक्षांची चर्चा करून घेणे काँग्रेसला अपेक्षित आहे. सध्याच्या निर्णय प्रक्रियेत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व आहे, त्यामुळे निर्णयांमध्ये सहभागी नसल्याची काँग्रेसची धारणा झाली आहे. राज्य सरकारमध्ये काँग्रेसची एक तृतीयांश भागीदारी असून विधानसभा अध्यक्षपदासह महसूल, ऊर्जा, सार्वजनिक बांधकाम ही खाती काँग्रेसकडे आहेत. तर गृह, आरोग्य ही खाती राष्ट्रवादीकडे आहेत.
काँग्रेसचे मंत्री आणि नेत्यांच्या नाराजीची कारणे
> २०० युनिटपर्यंत मोफत वीजेचा ऊर्जामंत्री राऊत यांचा काँग्रेसचा प्रस्ताव मार्गी लागत नाही.
> पालघर झुंडबळी प्रकरणी सोनिया गांधी यांच्यावर टीका होऊनही सरकार निष्क्रिय.
> मंत्री अशोक चव्हाण यांना कोरोना उपचारासाठी नांदेडहून मुंबईला येण्यासाठी अधिकाऱ्यांनी एअर अॅम्ब्युलन्सला परवानगी नाकारली.
> काँग्रेसच्या मंत्र्यांना त्यांच्या खात्यासाठी हवे ते सचिव दिले जात नाहीत.
> विधान परिषदेच्या राज्यपाल नामनियुक्तच्या १२ जागांमध्ये समसमान जागावाटप केले जात नाही, असाही आराेप आहे.
१२ जागांचा फाॅर्म्युला
राज्यपाल नामनियुक्तच्या १२ जागांमध्ये अधिकची एक म्हणजे पाच जागा काँग्रेसला हव्या होत्या. मात्र सध्याच्या सूत्रानुसार शिवसेनेला ५, राष्ट्रवादीला ४ आणि काँग्रेसला ३ जागा निश्चित केल्या आहेत. याची माहिती कळताच काँग्रेस नेत्यांत नाराजी पसरली आहे. त्या पार्श्वभूमीवर आपली नाराजी दोन्ही पक्षांना अप्रत्यक्ष समजावी यासाठी काँग्रेसने बैठक घेतल्याचे समजते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.