आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मास्क सक्तीचा निर्णय इतक्यात नाही:आरोग्यमंत्री राजेश टोपेंची माहिती, आषाढीची वारीही होणार

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यात कोरोना संसर्ग पुन्हा वाढू लागल्याचे चित्र आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.७) मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा झाली. त्यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी माध्यमांशी मास्क सक्तीबाबत सध्या कुठलाही निर्णय झाला नसल्याचे सांगितले.

टोपे म्हणाले की, कोविडबाबत प्रत्येक मंत्रिमंडळाच्या बैठकीत आरोग्य विभागामार्फत संपूर्ण माहिती दिली जाते. मुंबई, पुणे, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हीटी वाढल्याचे सांगण्यात आले आहे. यामुळे चाचण्यांची संख्या वाढवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. सहा जिल्ह्यांमध्ये ८ टक्के, ६ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे. ही या जिल्ह्यांपुरतीच वस्तुस्थिती आहे. पण यामध्ये केवळ १ टक्केच रुग्णांना रुग्णालयांत अॅडमिट करावे लागत आहे. त्यामुळे काळजीचा विषय आजिबात नाही, असेही टोपे म्हणाले. मास्कची सक्ती नसली तरी त्याची अंमलबजावणी व्हावी, असे आवाहन केले आहे, असे ते म्हणाले.

काळजी घेऊन वारी होणार
टोपे म्हणाले, आषाढी वारी संदर्भातही चर्चा झाली. वारीमध्ये १०-१५ लाख लोक येतील. अशा परिस्थितीत काळजी घेऊन ही वारी पूर्ण करावी, अशी प्रामुख्याने चर्चा झाली आहे. वारीची तयारी पुढे गेलेली आहे. यामागे लोकांच्या भावना आहेत, त्यामुळे वारी होईल.

दिलासादायक
९५.६९ टक्के रुग्ण भरतीशिवाय झाले बरे

राज्यात ४ जून रोजी सक्रीय रुग्णांची संख्या ५,८८८ असली तरी त्यापैकी फक्त २५४ (४.३१%) रुग्णांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करावे लागले आहे. बाकी ५,६३४ (९५.६९ %) रुग्ण लक्षण विरहित किंवा सौम्य लक्षणांचे असून ते घरीच बरे होत आहेत. रुग्णालयात दाखल रुग्णांपैकी फक्त ६१ रुग्ण (१.०४% ) गंभीर आहेत, तर ४६ रुग्ण (०.७८ %) आयसीयूत दाखल आहेत. आयसीयूतील रुग्णांपैकी ३ रुग्ण (०.०५ %) व्हेंटिलेटरवर आहेत तर ४३ (०.७३% ) ऑक्सिजनवर आहेत. आयसीयूबाहेर १५ (०.२५% ) रुग्णांना ऑक्सिजनवर उपचार सुरू आहेत.

बातम्या आणखी आहेत...