आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

नाट्यगृह:प्रेक्षकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत उघडणार नाट्यगृहाचे पडदे, नाट्य निर्मात्यांच्या बैठकीत झाला निर्णय

मुंबई10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची झाली ऑनलाइन बैठक

प्रेक्षक आणि कलाकार या दोघांच्याही सुरक्षेला प्राधान्य देत नाट्यगृहे सुरू करण्यासंदर्भात सकारात्मक निर्णय झाला आहे. नाट्यगृह चालू करण्यासंबंधी, रसिक प्रेक्षक व नाट्यकर्मी यांची काळजी तसेच रंगभूमीच्या दृष्टिकोनातून उपस्थित होणारे मुद्दे यावर चर्चा व्हावी या उद्देशाने ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई मराठी व्यावसायिक संघाच्या निर्मात्यांची ऑनलाइन बैठक झाली. यात २२ नाट्य निर्माते सहभागी झाले होते.

राज्यातील नाट्यगृहे आणि प्रयोग सुरू करण्यापूर्वीच्या उपाययोजना, नाट्यव्यवसायापुढच्या अडचणी टाळण्यासाठीचे ठराव एकमताने मंजूर करून निर्णय घेण्यात आले. राज्यभरात थांबलेले नाटकांचे प्रयोग मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या परवानगीशिवाय सुरू करता येणार नाहीत. तसेच, या दोन्ही संस्थांच्या परवानगी पत्राशिवाय कोणत्याही नाट्यगृहाच्या तारखा नाट्य निर्मात्यांना दिल्या जाणार नाहीत, असे ठरवण्यात आले. नाटकाला येणारा प्रेक्षक, तंत्रज्ञ आणि कलाकार यांच्या कोरोनासंदर्भात उपाययोजना काय असाव्यात यासंदर्भात मान्यवरांचा सल्ला घेऊन प्रयोग सादर करावेत, असे यात ठरवण्यात आले. यासंदर्भात साधारण आठ ते दहा दिवसांमध्ये उपाययोजनांची माहिती जाहीर करण्याची शक्यता आहे.

या निर्णयाचे पालन नाट्यनिर्मात्यांप्रमाणेच नाट्यगृहाशी संबंधित सर्व सरकारी व सामाजिक संस्थांनी काटेकोरपणे करावे, असे आवाहन मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघातर्फे प्रमुख कार्यवाह राहुल भंडारे यांनी केले. यांचे पालन न केल्यास संबंधित संस्थांना निर्माता संघ, रंगमंच कामगार संघटना, कलाकार संघ, व्यवस्थापक संघ यांच्याकडून सादरीकरणासाठी कोणतेही सहकार्य मिळू शकणार नाही, अशीही सूचना देण्यात आली आहे. या बैठकीमध्ये कोरोना काळात गरजू नाट्यकर्मींना झालेल्या मदतीचाही थोडक्यात आढावा घेण्यात आला.

बातम्या आणखी आहेत...