आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभुरटे, गद्दार, तोतयांना सांगतो, तुम्ही नाव चोरू शकता, पण शिवसेना नाही. निवडणूक आयुक्तांनी मोतीबिंदू झाला नसेल तर खरी शिवसेना बघायला यावे. शिवसेनेची स्थापना निवडणूक आयुक्तांच्या वडिलांनी नाही, तर माझ्या वडिलांनी केली. निवडणूक आयोगाने चोंबडेपणा करू नये. त्यांनी दिलेला निर्णय आम्हाला मान्य नाही, अशा शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी टीका केली. रत्नागिरीच्या खेडमधील गोळीबार मैदानात आयोजित सभेत ते बोलत होते. तत्पूर्वी सुषमा अंधारे यांनी आपल्या भाषणात शिंदे गट, भाजप, किरीट सोमय्यांना लक्ष्य केले.
उद्धव म्हणाले, ज्यांनी कधी बाळासाहेबांना बघितलेही नाही ते आम्हाला त्यांचे विचार सांगतात. नोकरी, उद्योग बाहेर जाऊ देणे हे बाळासाहेबांचे विचार नव्हते. मी घरात बसूनही महाराष्ट्र सांभाळला. तुम्ही दिल्लीसमोर मुजरे करत बसलात. तुम्ही फक्त तुटलेल्या एसटीवर गतिमान महाराष्ट्राची जाहिरात करता. महाराष्ट्र हे माझे कुटुंब, माझी जबाबदारी आहे. ज्या गतीने तुम्ही कुटुंब बदलले तो गतिमान महाराष्ट्र नकोय. दरम्यान, या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार संजय कदम यांनी ठाकरे गटात पक्षप्रवेशही केला.
शिंदे आणि फडणवीस यांचे उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर
उद्या नवाब मलिक-अनिल देशमुख यांना देशभक्ताची उपमा देऊ नये, एवढेच मला सांगावेसे वाटते. तेही असे करायला मागे-पुढे पाहणार नाहीत, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला. दुसरीकडे, ठाकरे यांच्या भाषणाची खिल्ली उडवत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, त्यांच्या नाकाखालून ४० लोक निघून गेल्याचा संताप व निराशा या दोन्ही गोष्टींमुळे त्यांच्या भाषणात केवळ हतबलता दिसत होती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.