आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या विकासाचा ‘सोनेरी त्रिकोण’ म्हणून ज्या मुंबई, पुणे, नाशिकचा अभिमानाने उल्लेख केला जातो, त्याच राज्याच्या औद्योगिक पट्ट्याला कोरोनाचा घट्ट विळखा बसला आहे. राज्यातील ८६ टक्के कोरोनाबाधित रुग्ण याच पट्ट्यामध्ये आढळले आहेत. राज्याचा या सुवर्ण त्रिकोणातील सात जिल्ह्यांत २८८ पैकी ७७ विधानसभा मतदारसंघ असून ९० टक्के भाग शहरी आहे. राज्याला ५० टक्के महसूल येथून मिळतो. औद्योगीक बेल्ट आणि कोरोना प्रादुर्भाव यासंदर्भात मुंबई विद्यापीठाचे अर्थशास्त्र प्रा. निरज हातेकर यांनी एक अहवाल बनवला आहे. महाराष्ट्राचा औद्योगिक बेल्ट हा कोरोना बेल्ट बनल्याचे त्यांनी त्यामध्ये दाखवून दिले आहे.
कोरोनाचा संसर्ग फैलावणारी राज्यात २८ ठिकाणे आहेत. त्यात १९ महापालिका क्षेत्रे असून ९ बिगर महापालिकांची क्षेत्रे आहेत. मुंबई, ठाणे, सातारा, पालघर, जळगाव, औरंगाबाद, अकोला, रायगड, नाशिक या महापालिका क्षेत्रात मोठ्या प्रमाणात कोरोनाचे नवे रुग्ण सापडत आहेत. तुलनेत चंद्रपूर, नागपूर, नांदेड, कोल्हापूर, सांगली-मिरज -कुपवाड, परभणी या महापालिका क्षेत्रांचा कोरोना संसर्गात अल्प वाटा आहे. मुंबई, पुणे, ठाणे, वसई-विरार आणि कल्याण- डोंबिवली या महापालिका क्षेत्रांत राज्यातील ५० टक्के कोरोना रुग्ण आहेत. तसेच मुंबई,ठाणे, पुणे, नाशिकच्या शहरी भागात नव्याने संसर्ग झालेले ५० टक्के रुग्ण आहेत. मे महिन्यात मुंबईचा राज्याच्या रुग्णसंख्येत ५४ टक्के वाटा होता, तो जूनमध्ये २४ टक्के झाला. मुंबईचा कोरोना ग्राफ खाली येत असतानाच मालेगाव, कल्याण-डोंबिवली, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड आणि नवी मुंबईतील रुग्णसंख्येचा आलेख वरती जात आहे, असे निष्कर्ष प्रा. हातेकर यांनी नोंदवले आहेत.
७० टक्के उद्योग मुंबई-पुणे-नाशकात
मे अखेर ७२ हजार उद्योगांना चालू करण्यास परवानगी दिली असून त्यात १२ लाख ५० हजार मजूर काम करत आहेत. यातील ७० टक्के उद्योग मुंबई, पुणे - नाशिक पट्ट्यातीलच आहेत. या सुवर्ण त्रिकोणाला कामगार-कर्मचाऱ्यांचा पुरवठा विदर्भ, मराठवाडा, कोकणातून होत असला तरी या प्रदेशात मात्र काेरोनाचा फैलाव अल्प आहे. राज्याच्या औद्योगिक बेल्टला कोरोना विळखा पडण्यास स्थलांतर कारणीभूत नाही, असा यात दावा केला आहे.
सुवर्ण त्रिकोण
जिल्हे | रुग्ण | मृत्यू |
मुंबई | ७६७६५ | ४४६३ |
ठाणे | ३६००२ | ८७१ |
पालघर | ५५७८ | १०१ |
रायगड | ३९८० | ९५ |
पुणे | २१३०३ | ७४० |
नाशिक | ४१११ | २१८ |
एकूण | १४७७३९ | ६२७० |
राज्य | १६९८८३ | ७६१० |
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.