आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वादग्रस्त वक्तव्य:सरकार वेळेवर निर्णय घेत नाही! केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा केंद्र सरकारला घरचा आहेर

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

भाजपच्या पहिल्या फळीतील नेते, दमदार मंत्री, ज्यांच्या कामाने त्यांचे जगभरात आदराने नाव घेतले जाते असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भाजपने संसदीय समितीतून नुकतेच हटवले आहे. गडकरी यांचा टॉप परफॉर्मन्स असूनही मोदी-शहांची री ओढत नाही त्यामुळेच त्यांचे पंख छाटल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी गडकरी यांनी विकासकामांच्या दिरंगाईवर बोलताना केंद्रातल्या मोदी सरकारला घरचा आहेर दिला. “प्रोजेक्ट आखले जातात, पण ते वेळेत पूर्ण कसे होतील, याकडे लक्ष दिले पाहिजे, असे सांगतानाच “सरकार वेळेवर निर्णय घेत नाही,’ असा भंडाफोड त्यांनी केला.

असोसिएशन ऑफ कन्सल्टिंग सिव्हिल इंजिनिअर्सने रविवारी आयोजित केलेल्या “नॅटकाॅन 20222’ या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून नितीन गडकरी यांनी उपस्थिती लावली होती. या वेळी केलेल्या मार्गदर्शनपर भाषणात विकासकामांच्या बाबतीत निर्णय घेताना सरकार वेळेवर निर्णय घेत नाही, असे विधान गडकरी यांनी केले.

नितीन गडकरींच्या वक्तव्याचा रोख प्रशासनाविरुद्ध की सरकारविरुद्ध यावर राजकीय वर्तुळात नवी चर्चा सुरू वक्तव्याचे राजकीय महत्त्व : गडकरी हे स्वत: एक शिस्तबद्ध आणि कामाचा धडाका लावत वेगाने काम करणारे मंत्री म्हणून सुपरिचित आहेत. स्वपक्षीयांसोबतच विरोधी पक्षांतही त्यांची प्रतिमा अत्यंत उजळ आहे. या स्थितीत गडकरींच्या तोंडून केंद्र सरकारविरुद्ध वक्तव्य यावे याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे.

नाराजी नेमकी कुणाबद्दल?
गडकरी यांनी प्रकल्पांची उभारणी वेळेत पूर्ण व्हावी याकडे लक्ष देण्याची गरज प्रतिपादित केली आहे. यात रोख सरकारच्या दिशेने आहे की प्रशासनाच्या, याबद्दल भाजप गोटात वेगवेगळे मतप्रवाह आहेत. तरीही अशा मुद्द्यांवर नेहमीच स्पष्ट बोलणारे गडकरी पुन्हा चर्चेत आले आहेत.

म्हणूनच गडकरींना काढले!
कामात प्रचंड धडाडी असलेले गडकरी एक मंत्री म्हणून यशस्वी ठरले असले तरी एक नेता म्हणून त्यांची प्रतिमा फक्त त्यांच्या वक्तव्यांमुळे नेहमीच वादाची ठरली आहे. विकासकामांबाबत त्यांनी केलेल्या वक्तव्यांचा परिणाम म्हणूनच त्यांना केंद्रीय समितीमधून डच्चू मिळाला असल्याचे मानले जाते.

डच्चू मिळाल्यावर मतप्रदर्शन
गडकरी यांना संसदीय मंडळ समिती व निवडणूक समितीमधून हटवून त्यांच्या जागी नागपूरचे देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. यावर गडकरी यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र गडकरी यांनी केंद्र सरकारवर ज्या पद्धतीने टीका केली त्यावर राजकीय चर्चा सुरू झाली आहे.

2024 पर्यंत टोल नाक्यातून

1 लाख 40 हजार कोटी रु. उत्पन्न

गडकरी म्हणाले की, “बांधकाम क्षेत्रात वेळेला खूप महत्त्व आहे. वेळ हीच आपली खरी संपत्ती आहे. मात्र, सरकारची सर्वात मोठी समस्या ही आहे की, सरकार वेळेवर निर्णय घेत नाही. भारतात बांधकाम क्षेत्राचे भविष्य उज्ज्वल आहे. मात्र, त्यासाठी आपल्याला जगातील नवे तंत्रज्ञान आत्मसात करावे लागेल. बँका वाटेल तेवढे कर्ज देण्यास तयार आहेत. प्रश्न आहे मानसिकतेचा.. पैसा उभा राहतो. पैशांची अडचण येत नाही. प्रोजेक्ट आखले जातात. मात्र ते वेळेवर पूर्ण होत नाहीत याची कधी कधी खंत वाटते. म्हणून माझे प्राधान्य हे प्रकल्प वेळेत कसे पूर्ण होतील याकडे असते.’ “माझ्या खात्याचे बोलायचे झाले तर भारतभर धडाक्यात प्रोजेक्ट सुरू आहेत. अनेकानेक महत्त्वाकांक्षी प्राेजेक्टवर काम सुरू आहे. सध्या टोलमधून वर्षाला 40 हजार कोटी आम्हाला उत्पन्न मिळते. 2024पर्यंत हेच उत्पन्न 1 लाख 40 हजार कोटींच्या आसपास असेल, असे सांगताना आता प्रकल्प उभारणीबरोबरच ते वेळेत कसे पूर्ण होतील याकडे लक्ष द्यायला हवे,’ अशी सूचना नितीन गडकरी यांनी केली.

बातम्या आणखी आहेत...