आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुशांतसिंह राजपूत प्रकरण:सरकारने मला नव्हे, तर सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला, पाटण्याचे एस.पी. विनय तिवारींचा गंभीर आरोप

मुंबई3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात विदेशी महिलेचे नाव; चौकशीची मागणी

महाराष्ट्र सरकारने मला नव्हे, तर सुशांतसिंह राजपूत प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला आहे, असा गंभीर आरोप सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास करण्यासाठी आलेले पाटण्याचे एस. पी. विनय तिवारी यांनी केला आहे. बिहारला जाण्यापूर्वी त्यांनी मीडियाशी संवाद साधला.

महाराष्ट्र सरकारने मला क्वॉरंटाइन केले नाही. तर, सुशांतसिंह आत्महत्या प्रकरणाचा तपासच क्वॉरंटाइन केला आहे. महाराष्ट्र सरकारच्या या भूमिकेमुळे या प्रकरणावर त्याचा विपरीत परिणाम झाला आहे, असा आरोप तिवारी यांनी केला. मुंबई महापालिकेच्या कोणत्याही अधिकारी-कर्मचाऱ्याने मला भेटून माझी क्वॉरंटाइनमधून मुक्तता करण्यात आली आहे असे सांगितलेले नाही. मला पालिकेने फक्त मेसेज पाठवून ही माहिती दिली. त्यामुळे मी आता पाटण्याला जायला निघालो आहे, असेही त्यांनी सांगितले.

सुशांतसिंहच्या वडिलांनी बिहारमध्ये आत्महत्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करण्यासाठी बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत आले होते. या पथकाने तपासही सुरू केला होता. नंतर लगेचच एस. पी. विनय तिवारीही तपासासाठी मुंबईत आले होते. मात्र, त्यांना पालिकेने १४ दिवसांसाठी होम क्वॉरंटाइन केले होते. त्यामुळे बिहार विरुद्ध मुंबई पोलिस असा संघर्ष निर्माण होऊन गदारोळ झाला.

प्रकरणात विदेशी महिलेचे नाव; चौकशीची मागणी : सुशांतच्या आत्महत्या प्रकरणात सुसान वॉकर या विदेशी महिलेचे नाव पुढे आले आहे. ती मेंटल थेरपिस्ट असून तिने दिलेल्या माहितीच्या आधारेच पोलिसांनी सुशांतच्या मृत्यूबद्दल निष्कर्ष काढल्याचा आरोप भाजपने केला आहे. वॉकर यांनी सुशांतच्या मानसिक स्थितीबाबत मीडियालाही वेगवेगळी माहिती दिली असून त्यांची पोलिस, सीबीआय व ईडी मार्फत चौकशी व्हायला हवी,’’ अशी मागणी भाजपने केली आहे. भाजपचे आमदार अॅड. आशिष शेलार यांनी यांनी या संदर्भात एक व्हिडिओ ट्विट केले आहे. मुंबई पोलिसांनी सुसान वॉकर नामक मनोविकारतज्ञ महिलेने दिलेल्या माहितीच्या आधारावर सुशांतने आत्महत्या केल्याचा निष्कर्ष काढला आहे. मात्र, त्यातून काही गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत,’’ असे शेलार यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्यांचा महाराष्ट्रद्रोह : काँग्रेस
सुशांतच्या आत्महत्या प्रकरणावरून भाजप नेत्यांवर काँग्रेसने जोरदार हल्ला चढवला आहे. ‘बिहार निवडणुकीच्या राजकारणासाठी तेथील पोलिसांचे गुणगान करून मुंबई पोलिसांना बदनाम करणाऱ्या भाजप नेत्यांचा महाराष्ट्रद्रोह उठून दिसत आहे,’’ अशी टीका काँग्रेसने केली आहे. आक्रमक झालेल्या भाजपला आता शिवसेनेबरोबरच काँग्रेस, राष्ट्रवादीनेही उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. सत्यजित तांबे आणि रोहित पवार या युवा नेत्यांनंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजप नेत्यांना लक्ष्य केले आहे. ‘ही मंडळी अत्यंत खालच्या पातळीवर उतरू शकतात. भाजप महाराष्ट्राच्या राजकीय परंपरेला लागलेला कलंक आहे,’ अशी टीका सावंत यांनी केली आहे.

बातम्या आणखी आहेत...