आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Government Will Bear The Burden Of Increased Electricity Bills During The Lockdown Period; Efforts To Reduce Dissatisfaction Among Power Consumers Across The State

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिलासा:लॉकडाऊन काळातील वाढीव बिलाचा भार सरकार उचलणार; राज्यभरामधील वीज ग्राहकांतील असंतोष कमी करण्याचा प्रयत्न

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 2019 च्या एप्रिल, मे व जून महिन्याइतकेच यंदा वीज बिल, घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलात असा मिळणार दिलासा

लॉकडाऊनच्या काळात प्रत्यक्ष वीज मीटर रीडिंग न घेता अंदाजे काढण्यात आलेल्या वाढीव वीज बिलामुळे नागरिक त्रस्त आहेत. या पार्श्वभूमीवर वीज ग्राहकांना दिलासा देण्यासाठी मविआ सरकारने नवा प्रस्ताव तयार केला आहे. त्यात राज्य सरकार युनिट वापरानुसार ग्राहकांना दिलासा देणार आहे.

या प्रस्तावानुसार, राज्यातील सर्वच वीज ग्राहकांची लॉकडाऊन काळातील वीज वापर आणि गेल्यावर्षी म्हणजे २०१९ मध्ये केलेल्या वीज वापराची तुलना केली जाणार आहे. २०१९ मध्ये ग्राहकांनी जेवढ्या विजेचा वापर केला असेल तेवढेच वीज बिल या वर्षीच्या एप्रिल, मे आणि जून महिन्यात ग्राहकांना भरावे लागणार आहे. त्यावरील वीज वापराचा भार हा राज्य सरकार उचलणार आहे.

बिल भरलेल्यांनाही दिलासा

लॉकडाऊन काळात ज्यांनी वीज बिल भरलेले असेल, त्या ग्राहकांच्या पुढील बिलातून ही रक्कम वजा केली जाणार आहे. राज्य सरकार केवळ घरगुती वीज ग्राहकांना हा दिलासा देणार आहे. व्यावसायिक आणि औद्योगिक वीज ग्राहकांसाठी हा निर्णय लागू राहणार नाही. प्रस्तावावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब होणार असल्याचे सांगितले जाते.

१०० युनिटपर्यंत वापराचे गणित

राज्य सरकार १०० युनिटपर्यंतच्या वीज वापरातील तफावत पूर्णपणे भरणार आहे. म्हणजेच गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात तुम्ही ८० युनिट वीज वापरली असेल आणि या वर्षी १०० युनिट वीज वापराचे बिल आले असेल तर तुम्हाला केवळ ८० युनिटचेच बिल भरायचे आहे. फरकाच्या २० युनिटचे बिल हे राज्य सरकार भरणार आहे.

१०१ ते ३०० युनिट वापरासाठी

जर विजेचा वापर १०१ ते ३०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराच्या ५० टक्के भार हा राज्य सरकार उचलणार आहे. त्याशिवाय जर वीज वापर हा ३०१ ते ५०० युनिटपर्यंत असेल तर फरकाच्या वीज वापराचा २५ टक्के भार राज्य सरकार उचलणार आहे. अशा पद्धतीने राज्यातील सर्वच कंपन्यांच्या घरगुती वीज ग्राहकांना राज्य सरकार दिलासा देणार आहे.

घरगुती वीज ग्राहकांना वीज बिलात असा मिळणार दिलासा

गेल्या वर्षी ५०० रुपये बिल आले असेल आणि लॉकडाऊन काळात जर २००० रुपये विजेचे बिल आले असेल, तर तुम्हाला फक्त ५०० रुपये भरावे लागणार आहेत.