आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तिढा सुटेना:संप झुगारून कामावर येणाऱ्या कर्मचाऱ्यांना आडकाठी नकोच, एसटी कर्मचारी संघटनांना उच्च न्यायालयाकडून तंबी

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आंदोलनावेळी अभंग गायले. - Divya Marathi
औरंगाबाद | एसटी कर्मचाऱ्यांनी कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आंदोलनावेळी अभंग गायले.

महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे (एसटी ) जे कर्मचारी संप झुगारून कामावर परतू इच्छित आहेत, त्यांना कोणीही आडकाठी करू नये. तसेच ज्या बसेस रस्त्यावर धावत आहेत, त्यांना अडवू नये, दगडफेक करू नये, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी एसटी कर्मचारी संघटनांना सुनावणीदरम्यान दिली. आता पुढील सुनावणी २२ नोव्हेंबर रोजी ठेवली आहे.

एसटी कर्मचारी संघटनांचा संप शांततेत सुरू असल्याबद्दल कोर्टाने कौतुक केले. सरकारनियुक्त समितीचा अहवाल येईपर्यंत संपकरी संघटनांनी वक्तव्य करु नये, वैयक्तिक घोषणाबाजी करू नये, अशी सूचनाही केली. सोमवारी राज्यभरात १५ मार्गांवर ५१ बसेस धावल्या तसेच ६,८९५ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा महामंडळाने केला. अनेक कर्मचाऱ्यांना कामावर परतण्याची इच्छा आहे. परंतु संघटनांच्या धाकामुळे ते रुजू होण्यास कचरत असल्याचे महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, समितीकडून फारशी अपेक्षा नाही. तसेच आघाडी सरकारचे सर्वेसर्वा शरद पवार हे सरकारचे बचाव नेते आहेत, असा आरोप कर्मचारी संघटनांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी केला. संपकरी संघटनांसाठी सरकारचे चर्चेसाठी दरवाजे खुले असल्याचे परिवहनमंत्री अॅड.अनिल परब म्हणाले.

समितीकडून आशा नाही : सदावर्ते
निवृत्त न्यायमूर्तीच्या नेतृत्वाखाली समिती असावी अशी मागणी संघटनांतर्फे करण्यात आली आहे. विलीनीकरणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारने नेमलेल्या समितीकडून कामगारांना विशेष आशा नाही, असा दावा कर्मचारी संघटनांचे वकील अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी न्यायालयाबाहेर माध्यमांशी बोलताना केला.

कोर्टाचा निर्णय मान्य करावा : परब
कोर्टात सरकारने याबाबत आपली बाजू मांडली आहे. आता न्यायालय जो निर्णय देईल तो सरकार व संपकरी संघटनांनीही मान्य करायला हवा. कोर्टाचे आदेश पाळण्याची जबाबदारी सर्वांची आहे. सरकार न्यायालयाच्या निर्णयाची वाट पाहत आहे, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांना सांगितले.

६ हजार ८९५ कर्मचारी कामावर परतल्याचा दावा
हायकोर्टाबाहेर आंदोलन करण्याचा संपकऱ्यांचा इशारा संपकरी कर्मचाऱ्यांनी आता मुंबई हायकोर्टाबाहेर आंदोलनाचा इशारा दिला. तसेच आझाद मैदानातील आंदोलकांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. मैदानातील आंदोलनाचे नेतृत्व सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर हे भाजपचे नेते करत आहेत.

बातम्या आणखी आहेत...