आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शैक्षणिक:राज्यात टीव्ही, रेडिओवर शाळा घेण्याचा विचार, शालेय शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला पत्र

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • दोन पाल्ये असल्यास मोबाइल कुठून आणायचे?

कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव कायम असल्याने राज्य मंडळाच्या शाळांचे वर्ग दूरचित्रवाणी आणि आकाशवाणीवर भरवण्याचा शालेय शिक्षण विभागाचा विचार सुरू आहे. तसे पत्र राज्याच्या शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड यांनी केंद्र सरकारला लिहिले आहे. यासंदर्भात माहिती देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांना मी पत्र लिहिले आहे. त्यात दूरदर्शनच्या दोन वाहिन्यांचे प्रतिदिन १० तास आणि आकाशवाणीचे २ तास राज्याला द्यावेत, अशी मागणी केली आहे.

राज्य शिक्षण, संशोधन व प्रशिक्षण परिषद (एससीईआरटी) आभासी शाळांवर अनेक वर्षे काम करते आहे. शालेय शिक्षण विभागाने व्हर्च्युअल स्टुडिओसुद्धा फार पूर्वी तयार केला आहे. एससीईआरटीने सुमारे १ हजार तासांपेक्षा अधिक कालावधीचे शैक्षणिक साहित्य निर्माण केलेले आहे. त्याचा वापर करून राज्य शिक्षण मंडळांच्या सर्व इयत्तांच्या विद्यार्थ्यांचे वर्ग घेण्याचा मानस असल्याचे मंत्री गायकवाड यांनी सांगितले.

गेले १० आठवडे राज्यातील शाळा बंद आहेत. तसेच कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यंदाचे शैक्षणिक सत्र नियोजनानुसार म्हणजे १५ जूनपासून सुरू होणे अवघड आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये म्हणून दूरचित्रवाणी आणि रेडिओची मदत घेण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. राज्य शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या संपलेल्या शैक्षणिक सत्राच्या परीक्षा यंदा होऊ शकल्या नाहीत. १० वी १२ वीचे विद्यार्थी वगळता सर्व विद्यार्थ्यांना पुढच्या वर्गात पाठवण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाच्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा मात्र लाॅकडाऊन लागू करण्यापूर्वी पार पडल्या होत्या.

दोन पाल्ये असल्यास मोबाइल कुठून आणायचे?

राज्य शिक्षण मंडळाच्या शाळांतील राज्यातील विद्यार्थी संख्या २ कोटी २५ लाख इतकी आहे. दोन पाल्ये असल्यास दोन मोबाइल किंवा दोन टीव्ही कुठून आणणार? त्यात विजेचा प्रश्नसुद्धा गंभीर असल्याचे पालकांचे म्हणणे आहे. केंद्रीय शिक्षण मंडळाचे वर्ग १ जूनपासून प्रारंभ होत आहे. केंद्रीय मंडळाच्या शाळांनी आॅनलाइन वर्गाचे नियोजन केले आहे.

बातम्या आणखी आहेत...