आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राज्याचे माजी मुख्यमंत्री व काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांना आयकर विभागाने नोटीस बजावली आहे. गेल्या दहा वर्षांत उत्पन्न कसे वाढले तसेच संपत्तीचे मागील दहा वर्षांतील विवरण मागण्यात आले आहे. २१ दिवसांत या नोटिसीला चव्हाण यांना उत्तर द्यायचे आहे.
ऐन दिवाळीतच आयकर विभागाकडून नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिसीला आपले वकील किंवा आपण हजर राहण्यास सांगण्यात आले आहे. त्यादृष्टीने आपण योग्य ती कार्यवाही करत आहोत, असे चव्हाण यांनी सांगितले. त्यांनी केंद्रातील मोदी सरकारला लक्ष्य केले. मोदी सरकार आणि भाजप सातत्याने विरोधकांना लक्ष्य करत आहेत. लॉकडाऊनमुळे देशाची विस्कटलेली आर्थिक घडी ते मोदी सरकारने चर्चेविना मंजूर केलेल्या कृषी कायद्यांपर्यंत अनेक मुद्द्यांवर आपण मोदी सरकारवर टीका केली होती. त्यामुळे आपल्याला त्रास देण्यासाठी ही नोटीस बजावली गेली असल्याची शक्यता नाकारता येत नाही, असा दावा चव्हाण यांनी केला.
चार महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना अशीच नोटीस बजावण्यात आली होती. त्याची आठवण करून देत चव्हाण यांनी केंद्रातील भाजप सरकारच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका केली. सत्तेचा वापर कसा करायचा? तो कोणासाठी करायचा? याबाबत भाजप सरकारांनी नियोजनबद्धपणे व्यूहरचना केली आहे. त्यानुसार सगळे भाजप सरकारांचे काम सुरू असते असे ते म्हणाले. आपण आयकर विभागाच्या या नोटिसीला योग्य ते स्पष्टीकरण लवकरच देणार आहोत, असे चव्हाण यांनी कराड येथून बोलताना ‘दिव्य मराठी’ला सांगितले.
आघाडीत आनंदाच्या उकळ्या
पृथ्वीराज चव्हाण काँग्रेसचे राज्यातील मोठे नेते आहेत. मात्र पक्षांतर्गत त्यांना विरोधक जास्त आहेत. त्यामुळे त्यांना बजावलेल्या नोटिसीसंदर्भात काँग्रेसजनांतून काहीही प्रतिक्रिया उमटलेली नाही. काँग्रेसचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रवादीच्या गोटातही आनंदाच्या उकळ्या फुटत आहेत. चव्हाण यांनी सिंंचन श्वेतपत्रिका आणि शिखर बँकेवर प्रशासक नेमून काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादीला अडचणीत आणले होते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.