आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
शाश्वत शेती अभियानांतर्गत अनुसूचित जमातीच्या (एसटी) उन्नयनासाठी राबवण्यात येणाऱ्या परंपरागत कृषी विकास योजनेतील लाभार्थीसाठी मंगळवारी राज्य सरकारने ५० कोटी निधी वितरित केला. अनुसूचित जाती योजनांना गती द्या व हा निधी अखर्चित राहता कामा नये, अशी सूचना काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी केली होती. त्याला राज्य सरकारने गांभीर्याने घेतले आहे.
सरकारमध्ये आदिवासी विकास विभाग काँग्रेसकडे आहे. सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादीकडे आहे. मात्र वित्त विभाग उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांच्याकडे असल्याने आदिवासी विभागाच्या योजनांना निधी दिला जात नाही, अशी तक्रार काँग्रेस नेत्यांनी सोनिया गांधी यांच्याकडे केली होती. त्यानंतर सोनिया यांनी महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाची आठवण मुख्यमंत्री उद्धव यांना दिली हाेती. त्यामुळे राज्य सरकारच्या कृतीत फरक पडेल, अशी आशा काँग्रेस नेते बाळगून आहेत. दलित व आदिवासी काँग्रेसचा परंपरागत मतदार आहे. राज्यातील आदिवासीबहुल जिल्ह्यात ओबीसी समाजाच्या आरक्षणाची टक्केवारी वाढवण्याचा ठाकरे सरकारचा प्रयत्न आहे. त्यावरून प्रदेश काँग्रेसमध्ये मोठी नाराजी आहे.
याेजनेत राज्याचा वाटा ४० टक्के
२०१९-२० पासून राज्यात अनुसूचित जमातीच्या लाभार्थींसाठी परंपरागत कृषी विकास योजना राबवण्यात येते. या योजनेत केंद्राचा ६० टक्के तर राज्याचा ४० टक्के वाटा आहे. २०१९-२० वर्षासाठी केंद्राने आपल्या हिश्श्याचे १०८ कोटी दिले होते, तर राज्याचा वाटा ७२ कोटी इतका होता.
केंद्र सरकारच्या हिश्श्याचे ३० कोटी
कोरोनामुळे राज्य सरकारने आर्थिक तुटीचे कारण पुढे करत या योजनेचा राज्याच्या हिश्श्याचा निधी रोखला होता. त्यामुळे अनुसूचित जमातीच्या ९३२ लाभार्थी गटांना त्याचा फटका बसला होता. पैकी केंद्राच्या हिश्श्यातील ३० काेटी व राज्याचे २० कोटी असा ५० कोटी निधी कृषी आयुक्तालयाकडे वर्ग केला आहे.
सोनिया गांधींचे पत्र : अनुसूचित जमातीच्या योजनांचा निधी पूर्णपणे वापरला जात नाही. अनुसूचित जमातीला लोकसंख्येच्या प्रमाणात निधी मिळत असतो. पण, तो अखर्चित राहतो. तसे होऊ नये यासाठी कायदा करावा, अशी सूचना सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून केली होती. तसेच दलित व आदिवासी समाजाच्या योजना आघाडी सरकारने गतिमान कराव्यात, असे गांधी यांनी पत्रात म्हटले होते.
शिवसेना-काँग्रेस संबंधांत तणाव
काँग्रेसच्या अखत्यारीतील खात्यांचा निधी रोखल्यामुळे आघाडीत आधीच कुरबुरी सुरू होत्या. त्यात े यूपीएचा भाग नसूनही शिवसेनेच्या मुखपत्रातून अलीकडशरद पवारांना यूपीए अध्यक्ष करण्याचे सल्ले दिले जात आहेत. शिवाय मुखपत्रातून सातत्याने टीका होत असल्यामुळे काँग्रेस नेते अधिकच खट्टू झाले आहेत. त्यामुळे शिवसेना-काँग्रेसमध्ये तणाव आहे. आदिवासी योजनांचा निधी जारी करून त्यावर फुंकर घालण्याचा हा प्रयत्न असल्याचे म्हटले जाते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.