आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
नववर्षानिमित्ताने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पोलिस दलाशी संवाद साधला. या वेळी उद्धव यांनी मुंबई पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाऱ्या भाजप नेत्यांवर निशाणा साधला. मध्यंतरी पोलिसांवर बरेच आरोप झाले. मात्र, आरोप करणाऱ्यांची आज तोंडे बंद झाल्याचे सांगत पोलिसांवर कोणताही डाग लागू देणार नाही, अशी ग्वाही त्यांनी दिली.
नववर्षाच्या पहिल्या दिवशी मुख्यमंत्री ठाकरे यांनी मुंबई पोलिस आयुक्तालयाला भेट दिली आणि कोविड योद्धे तसेच उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या पोलिस अधिकारी-कर्मचाऱ्यांचे कौतुक केले. अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांवर तपासात ढिलाईचे आरोप करण्यात आले होते. बिहार निवडणुकीच्या तोंडावर भाजप नेत्यांनी आघाडी सरकार, मुंबई पोलिसांवर टीका केली होती. हे प्रकरण नंतर सीबीआयकडे सोपवण्यात आले. परंतु एम्सच्या अहवालात सुशांतने आत्महत्या केल्याचेच स्पष्ट झाले. सीबीआयने अद्याप तपासाचे निष्कर्ष जाहीर केले नाहीत. तसेच अभिनेत्री कंगना रनौत हिने तर त्याही पुढे जाऊन मंुबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरसोबत केली होती. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.
महाराष्ट्र पोलिसांवर डाग येऊ देणार नसल्याची दिली ग्वाही
कोरोना संकट अजूनही गेले नाही
मुख्यमंत्री पुढे म्हणाले, व्यवहार बंद ठेवणे ही गोष्ट चांगली नाही हे सगळ्यांनाच कळते, पण अजूनही संकट गेले नाही. पाश्चिमात्य देशांत कोरोनाचा नवा धोका तयार झाला आहे. त्यामुळेच नागरिकांच्या हितासाठी किमान खबरदारी म्हणून उपाययोजना केल्या जात आहेत. जीव धोक्यात घालून यंत्रणा काम करत आहेत. त्यामुळे नागरिकांनी किमान खबरदारी घ्यावी म्हणून आणि शिस्त पाळावी म्हणून जमावबंदीचे आदेश दिले असल्याचे त्यांनी नमूद केले.
काल तुम्ही जागले म्हणून आजचा दिवस उत्साहाचा
कालची रात्र तुम्ही जागून काढली म्हणून आज आम्ही नवीन वर्षाचा पहिला दिवस उत्साहाने सुरू करू शकलो. पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी सतत कर्तव्याच्या विचारात असतात. कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी त्यांना वेळ-काळ याची पर्वा न करता काम करावे लागते. चोवीस तास त्यांना कामासाठी तातडीचे बोलावणे, तपास आणि बंदोबस्त यासाठी सज्ज राहावे लागते याचा उल्लेख करत त्यांनी राज्यातील समस्त नागरिकांच्या वतीने शुभेच्छा दिल्या.
महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही : महाराष्ट्र पोलिसांच्या कर्तृत्वाला तोड नाही. कुणी कितीही प्रयत्न केले तरीही ते मुंबई असो किंवा महाराष्ट्र पोलिसांच्या सूर्यप्रकाशाइतक्या स्वच्छ कर्तृत्वावर डाग लावू शकत नाही. आपल्या पोलिस दलाची परंपरा आणि कर्तृत्वच असे उत्कृष्ट आहे. असेच कर्तृत्व पुढील वर्षभर नव्हे, तर कित्येक वर्षे गाजवत राहावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.