आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

कोरोना नियंत्रणासाठी अभियान:'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियान सुरू केले जाणार, राज्यातील प्रत्येक घरातील सदस्याची केली जाणार आरोग्य तपासणी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबईत 'चेस द व्हायरस' ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला आहे. यावेळी त्यांनी अनेक विषयांवर भाष्य केले. यामध्ये कोरोनाविषयी बोलत असताना त्यांनी एक महत्त्वाची घोषणा केली. नागरिकांच्या सुरक्षेसाठी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' अभियान सुरू केले जाणार आहे. या अंतर्गत राज्यातील प्रत्येक घरातील प्रत्येक सदस्यांची पुढील महिन्याभरात तपासणी केली जाणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

लोकप्रतिनीधींनी जबाबदारी घेऊन सहकार्य करावे
या अभियानाविषयी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, महाराष्ट्राची लोकसंख्या 12 कोटी आहे. राज्यातील एवढ्या बारा कोटी नागरिकांची आरोग्य तपासणी करणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. पण ही गोष्ट सोपी करण्यासाठी प्रत्येक ठिकाणांच्या लोकप्रतिनिधींनी जबाबदारीने काम करणे गरजेचे आहे. प्रत्येकाचं घरं शोधणं ही कठीण बाब असली तरी शक्य आहे. सरपंचापासून खासदारापर्यंत सर्व लोकप्रतिनिधींनी आपापल्या वॉर्डाची जबाबदारी घेतली तर संपूर्ण महाराष्ट्र आपण व्यापता येऊ शकतो. याद्वारे प्रत्येक घराची आणि त्यातील सदस्यांच्या आरोग्याची चौकशी आपण करु शकतो. पुढील महिन्याभरात या लोकप्रतिनिधींनी किमान दोन वेळा लोकांच्या आरोग्याची चौकशी करण्यासाठी आपली टीम पाठवावी असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.

असे असेल अभियान
मुख्यमंत्र्यांनी या अभियानाविषयी सांगितले की, या अभियानासाठी शासनाच्या आरोग्य विभागाचे, महसूल विभागाचे कर्मचारी तसेच इतर आरोग्य कर्मचारी कार्यरत असतील. तसेच त्यांच्यासोबत पक्षाचे कार्यकर्ते देखील सहभागी होऊ शकतात. हे लोक प्रत्येक घरामधील व्यक्तींची चौकशी करतील. या चौकशीमध्ये घरात पन्नाशीच्या पुढील किती सदस्य आहेत? त्यांची ऑक्सिजन लेवल काय आहे? यासोबतच इतर व्यक्तींना व्याधी किंवा आजाराची कोणती लक्षणं आहेत का? जर काही लक्षणं असतील तर ती शासनाच्या यंत्रणेच्या लक्षात आणून द्यायची, त्यानंतर यावर पुढील उपचार काय करायचे? हे उपचार कुठे केले जातील? या सर्वांच मार्गदर्शन केले जाईल. जसे मुंबईत 'चेस द व्हायरस' ही योजना राबवली जात आहे त्याचप्रमाणे ही योजना राज्यभरात राबवली जाणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं.

मुख्यमंत्र्यांनी दिल्या महत्त्वाच्या सूचना
मुख्यमंत्री पुढे म्हणाले की, गर्दीच्या ठिकाणी सदासर्वदा मास्क लावून फिरावे. आवश्यक नसेल तर घराबाहेर पडू नका. पण आवश्यक असल्यास गर्दीच्या ठिकाणी मास्क लावा. अंतर ठेवून उभे राहा. वारंवार हात धुवा असंही मुख्यमंत्री म्हणाले. माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिम सुरू करणार आहेत. यामध्ये सर्वांनी आपल्या कुटुंबीयांची जबाबदारी घ्यायची आहे. जेव्हा जनता युद्धात उतरते तेव्हा युद्ध जिंकता येते. आपल्यााला कोरोनाविरोधात लढायचे आहे. यामुळे सर्व नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.