आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुन्हा पत्र लिहिले आहे. या पत्रात पवार यांनी अडचणीत आलेल्या बांधकाम व्यवसायास संकटातून बाहेर काढण्यासाठी या उद्योगास केंद्राने विविध सवलती द्याव्यात, अशी मागणी केली आहे.
पवार पत्रात म्हणतात की, कोरोनामुळे देशातील बांधकाम व्यवसाय ठप्प आहे. गेल्या तीन महिन्यांपासून या क्षेत्रातील उलाढाल बंद आहे. त्यामुळे या क्षेत्राचे मोठे नुकसान झाले आहे. या क्षेत्रातील मजुरांचे स्थलांतरही मोठ्या संख्येने होत आहे. यामुळे हे क्षेत्र अडचणीत आले आहे. परिणामी देशाच्या विकास दरावर (जीडीपी) याचा परिणाम होत आहे.
या व्यवसायाला अडचणीतून बाहेर आणण्यासाठी कर्जाचे पुनर्गठन करायला हवे, अतिरिक्त संस्थात्मक निधी उपलब्ध करून देण्याची गरज आहे. तसेच काही प्रमाणात व्याज माफ केले पाहिजे. बांधकाम क्षेत्रासाठी विशेष धोरण आखण्याची गरज आहे, असेही पवार यांनी बुधवारी पाठवलेल्या पत्रात नमूद केले आहे.
जीडीपीमध्ये बांधकाम व्यवसायाचा हातभार
बांधकाम व्यवसाय देशाच्या जीडीपीमध्येही मोठा हातभार लावतो, त्यामुळे राष्ट्रासाठी महत्त्वाच्या असणाऱ्या या मुद्द्यांकडे स्वत: लक्ष द्यावे आणि ठोस पावले उचलावीत, अशी विनंतीही पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केली आहे. २४ मे रोजी बांधकाम व्यावसायिकांच्या राष्ट्रीय संघटनेने (क्रेडाई) पंतप्रधानांना आपल्या विविध मागण्यांचे निवेदन पाठवलेले आहे. त्याची आठवण पवार यांनी या पत्रात पंतप्रधानांना करून दिली आहे.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.