आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दिव्य मराठी विशेष:राजकीय घडामोडींचे नवे केंद्र मुंबई महापौर बंगला

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: चंद्रकांत शिंदे
  • कॉपी लिंक
  • दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगला होते आवडते ठिकाण

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यापासून दादर येथील महापौर बंगल्याला खूप महत्त्व प्राप्त झाले असून सरकारच्या विविध बैठका महापौर बंगल्यातच घेतल्या जात आहेत. आजवरचे मुख्यमंत्री सर्व बैठका मंत्रालय, मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा किंवा राज्य अतिथीगृह सह्याद्री येथेच घेत असत. परंतु मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महापौर निवासस्थान हे आवडते ठिकाण असल्याने येथे बैठकांचा सिलसिला मोठ्या प्रमाणावर सुरू झाल्याने सरकारच्या चर्चेचे हे नवे केंद्र तयार झाल्याचे दिसून येत आहे.

महापौर बंगला हा दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे आवडते ठिकाण होते. भाजपचे दिल्लीतील वरिष्ठ नेते मुंबईत आले की त्यांच्यासोबतच्या बैठका या महापौर बंगल्यातच होत असत. तसेच पक्षाच्या बैठकाही ते याच बंगल्यात घेत असत. ते रोज संध्याकाळी बंगल्याच्या मागील बाजूस असलेल्या हिरवळीवर चालण्यासही येत असत. महापौर बंगल्यात एक मजली पुरातत्व वास्तू असून बाळासाहेबांना पहिल्या मजल्यावर जाण्यासाठी विशेषत्वाने लिफ्टची परवानगी देण्यात आली होती. लिफ्ट तयार झाल्यानंतर बाळासाहेब पहिल्या मजल्यावर जात असत. शिवाजी पार्कवरील सभा किंवा दसरा मेळाव्याला बाळासाहेब येत तेव्हा ते प्रथम महापौर बंगल्यातच जात आणि थोडा आराम करीत.

समुद्रकिनारी आपला बंगला असावा असे प्रत्येक श्रीमंताचे स्वप्न असते. महापौर बंगला ही पुरातत्व वास्तू असून समुद्रकिनारी असलेल्या या बंगल्यात मागच्या बाजूला खूप मोठे लॉन आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांनाही हा बंगला खूप आवडतो. मुंबई मनपावर शिवसेनेची कायम सत्ता असल्याने हा बंगला कायमच शिवसेनेच्या ताब्यात राहिला आहे. दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक याच बंगल्यात व्हावे अशी इच्छा उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली होती आणि तत्कालीन सरकारने ही मागणी मान्य केली. महाविकास आघाडीच्या मंत्र्यांच्या बैठकाही मुख्यमंत्री याच ठिकाणी घेऊ लागल्याने महापौर बंगला हे सत्ताधाऱ्यांचे नवे चर्चा केंद्र झाले आहे.

शिवसेनाप्रमुखांप्रमाणेच उद्धव ठाकरेंचा पायंडा

बाळासाहेबांप्रमाणेच उद्धव ठाकरेही मुख्यमंत्री होण्यापूर्वी दररोज महापौर बंगल्यात संध्याकाळी चालण्यास येत असल्याचे सांगितले जाते. बंगल्याच्या मागच्या बाजूला असलेल्या हिरवळीवर ते तासभर चालतात. पक्षाच्या बैठकाही ते येथेच घेत असत आणि हीच परंपरा त्यांनी आता मुख्यमंत्री झाल्यानंतरही कायम ठेवली आहे. त्यामुळेच सरकारच्या बैठका मंत्रालय, वर्षा, सह्याद्री यांच्यासोबतच महापौर बंगल्यावरही होऊ लागल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...