आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्य सेवा पूर्व परीक्षेच्या तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. सुधारित तारखेनुसार 21 मार्च रोजी ही परीक्षा घेतली जाणार आहे. तत्पूर्वी 14 मार्च रोजी होणारी परीक्षा कोरोनाचे कारण देत पुढे ढकलली होती. त्यावर विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते. अखेर मुख्यमंत्र्यांना गुरुवारी संध्याकाळीच ही परीक्षा पुढील आठवड्यात घेणार अशी घोषणा करावी लागली. त्यानंतर शुक्रवारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने सुधारित तारीख जाहीर केली.
14 तारखेला होणार असलेली परीक्षा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुढे ढकलण्यात आली, त्यावर केवळ विद्यार्थीच नव्हे तर विरोधी पक्षासह, सत्ताधारी पक्षात सुद्धा नाराजी आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने निर्णय घेताना चक्क राज्य सरकारलाच विश्वासात घेतले नाही असा दावा काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी केला. तर राष्ट्रवादी काँग्रेसने सुद्धा परीक्षा पुढे ढकलल्या जाऊ नये अशी भूमिका मांडली.
दरम्यान, एमपीएससीच्या पूर्व परीक्षा 14 तारखेलाच घेण्यात याव्या अशा स्वरुपाचे निवेदन विद्यार्थ्यांनी विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना दिले आहे. त्यामुळे, या प्रकरणावर राजकारण आणखी चिघळणार असे चित्र दिसून येत आहे.
21 तारखेलाच इतरही परीक्षा आहेत, त्या कशा देणार?
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 तारखेला होणारी पूर्व परीक्षा आता 21 मार्चला होणार असल्याचे जाहीर केले. परंतु, त्या दिवशी इतरही परीक्षा आहेत. त्या दिवशी विमानतळाच्या परीक्षा आहेत. पूर्व परीक्षेचे दोन पेपर असतात. इतर परीक्षा त्या दिवशी असताना त्याच दिवशी उमेदवार एमपीएससीची परीक्षा कशी काय देणार? असा सवाल विद्यार्थी संघटना आणि क्लासेसच्या शिक्षकांनी केला आहे. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
MPSC प्रकरणावर राजकारणाची काहीच गरज नाही -उपमुख्यमंत्री
MPSC च्या परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय हा राज्य लोकसेवा आयोगानेच घेतला. त्यात सरकारचा काहीच संबंध नाही. त्यानंतर एमपीएससीच्या परीक्षांची नवीन तारीख सुद्धा जाहीर करण्यात आली. आता या विषयावर कुणाला राजकारण करायचे असेल तर त्यांना करू द्या. पण, यामध्ये विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरण्याची किंवा राजकीय नेत्यांनी राजकारण करण्याची काहीच गरज नाही. विद्यार्थ्यांनी त्यांचा अभ्यास सुरू ठेवावा. परीक्षा आता 21 मार्च रोजी होणार आहेत असे अजित पवार म्हणाले आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.