आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • The Proposal Of Electricity Bill Concession Sent By The Congress Was Blocked By The NCP; Refusal To Give Concession To Finance Department Even After Sending Proposal 8 Times

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

काटाकाटी:वीज बिल सवलतीचा प्रस्ताव अडवून राष्ट्रवादीने काँग्रेसला पाडले तोंडघशी; 8 वेळा प्रस्ताव पाठवूनही अर्थ खात्याचा सवलत देण्यास नकार

मुंबई3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • वीज देयकात सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, लाखो ग्राहकांचा विश्वासघात - फडणवीस
  • फडणवीसांच्या काळात महावितरणची थकबाकी 50 हजार कोटींवर : ऊर्जामंत्री

लॉकडाऊन काळातील वाढीव वीज बिलामध्ये सवलत देणे शक्य नाही. मीटरप्रमाणे देयके भरलीच पाहिजेत, असे ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत यांनी बुधवारी स्पष्ट केले. त्यामुळे वीज बिले घटवणार असे वारंवार आश्वासन देणाऱ्या काँग्रेसला आघाडीतील सहकारी पक्ष राष्ट्रवादीनेच तोंडघशी पाडल्याचे स्पष्ट झाले. कारण वीज बिल सवलतीसाठी ऊर्जा खात्याकडून ८ वेळा प्रस्ताव पाठवूनही राष्ट्रवादीच्या अखत्यारीतील अर्थ खात्याने अर्थात अर्थमंत्री अजित पवार यांनी तो प्रस्ताव अडवून धरला होता. तर या मुद्द्यावरून आघाडी सरकारला कोंडीत पकडण्याची आयतीच संधी भाजपला मिळाली असून त्यावरून आता सत्ताधारी-विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत.

दरम्यान, कोरोनामुळे महावितरणच्या आर्थिक स्थितीवर परिणाम झाला असला तरी महावितरणला खरा फटका यापूर्वी सत्तेत असलेल्या फडणवीस सरकारने ‘सरासरी’ कार्यक्षमता न दाखवल्याने बसला आहे. फडणवीस सरकारच्या काळात महावितरणची थकबाकी ५० हजार कोटींवर गेली, असा गंभीर आरोप राज्याचे ऊर्जामंत्री डाॅ. नितीन राऊत यांनी बुधवारी केला.

महावितरण तोट्यात :

वीज ग्राहकांना कोरोनाकाळातील देयकातून दिलासा मिळावा म्हणून मी पूर्ण प्रयत्न केले. मात्र केंद्र सरकारने यात मदत केली नाही. ६९% वीज देयकांची वसुली झाली आहे. त्यामुळे आता सवलत देण्याचा विषय बंद झाला. महावितरण ६९ हजार कोटींच्या तोट्यात आहे. आम्ही कर्ज काढू शकत नाही, असे ऊर्जामंत्री राऊत यांनी स्पष्ट केले.

> कोरोनाकाळातील वीज देयकात सवलत देण्याचे जाहीर करून घूमजाव करणे, हा लाखो ग्राहकांचा विश्वासघात आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते

> कोरोनाकाळातील सहा महिन्यांच्या वीज देयकांत ५० टक्के सवलत दिल्यास केवळ ४ हजार ५०० कोटींचा बोजा पडणार आहे. - प्रताप होगाडे, वीजतज्ज्ञ

....तर राज्य सरकारला त्याची दुरुस्ती करावी लागेल : विजय वडेट्टीवार

कोरोनाकाळातील वाढीव वीज बिलांबाबत काही चुकीचे झाले असल्यास राज्य सरकारला त्याची दुरुस्ती करावी लागेल, अशी भूमिका राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी येथे पत्रकार परिषदेत मांडली. यासंदर्भात मंत्रिमंडळात चर्चा करू. कारण लोकभावना तीव्र आहेत. चुकीची बिले आल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणावर आहेत. सधन ग्राहकांनी सवलतीची वाट न पाहता ५० टक्के वीज देयके आधीच भरलेली आहेत. उरलेले ५० टक्के लोक गरीब आणि सामान्य आहेत. या विषयावर मंत्रिमंडळात चर्चा करावी लागेल. दरम्यान, ऊर्जा खाते विदर्भाकडे आहे. शिवसेनेला मदत व काँग्रेसला नकार, हा काँग्रेसला अडचणीत आणण्याचा प्रयत्न आहे का, या प्रश्नाला वडेट्टीवार यांनी बगल दिली.

काँग्रेसमध्ये नाराजी :

कोरोनाकाळातील वीज देयकात सवलत द्यावी म्हणून ऊर्जा विभागाने ८ वेळा वित्त विभागाकडे प्रस्ताव पाठवला. मात्र अर्थमंत्री अजित पवार यांनी तो अडवला. परिणामी काँग्रेसच्या विभागांना निधी दिला जात नसल्याची भावना काँग्रेस मंत्र्यांत निर्माण झाली आहे. यापूर्वीही काँग्रेसच्या वाट्यास आलेल्या खात्यांना निधी मिळत नसल्याची तक्रार घेऊन सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण व प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती.

कोरोनाकाळात थकबाकी ९ हजार कोटींनी वाढली

कोरोनाकाळात वीज देयके भरली न गेल्याने महावितरणची थकबाकी ९ हजार कोटींनी वाढून ऑक्टोबरमध्ये ५९ हजार १०२ कोटींवर पोहोचली. मार्च २०२० ला घरगुती ग्राहकांची १ हजार ३७४ कोटींची थकबाकी ४ हजार ८२४ कोटींवर गेली. वाणिज्य ग्राहकांची ८७९ काेटींची थकबाकी १ हजार २४१ कोटींवर तर औद्योगिक ग्राहकांची ४७२ कोटी थकबाकी ९८२ कोटींवर पोहोचली आहे, असे ऊर्जामंत्री राऊत म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...