आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि बडनेराचे आमदार रवी राणा यांच्या अडचणींत आणखी भर पडली आहे. राणा दांपत्याच्या खार येथील घरात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार असून त्याची मुंबई महापालिकेकडून तपासणी करण्यात येणार आहे. याबाबत पालिकेच्या एच पश्चिम विभाग कार्यालयाकडून तशी नोटीस पाठवण्यात आली आहे.
नवनीत राणा आणि रवी राणा यांचे खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या आहेत. इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करण्यात आले आहे, पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे, अशा प्रकारच्या तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटिसा पाठवल्या आहेत. त्याप्रमाणेच राणा यांच्या घरालाही नोटीस पाठवण्यात आली आहे.
बुधवार, ४ मे रोजी मुंबई महापालिकेचे पथक तपासणीसाठी या इमारतीत जाणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पालिकेच्या वांद्रे एच पश्चिम विभागाचे सहायक विनायक विसपुते यांनीही या माहितीस दुजोरा दिला आहे.
नवनीत आणि रवी राणा यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याची घोषणा केली होती. त्यासाठी अमरावती येथून मुंबईत दाखल झाल्यानंतर हे दांपत्य त्यांच्या खार परिसरातील घरातच वास्तव्याला होते. याठिकाणी शिवसैनिकांनी धडक दिल्यानंतर मोठा तणाव निर्माण झाला होता. त्यानंतर राणा दांपत्याने माघार घेतली होती. मात्र, पोलिसांच्या कारवाईपासून त्यांची सुटका झाली नाही. कायदा आणि सुव्यवस्थेच्या मुद्द्यावरून पोलिसांनी दोघांनाही अटक केली. गेल्या दहा दिवसांपासून राणा दांपत्य कोठडीमध्ये आहे. अशावेळी मुंबई पालिकेच्या नोटिसीने या दोघांपुढे नवे संकटच उभे ठाकले आहे.
सूड की योगायोग?
मुंबई महापालिकेवर गेली २८ वर्षे शिवसेनेची सत्ता होती. जे सेनेच्या विरोधात जातात त्यांच्यावर पालिकेकडून कारवाईचा बडगा उगारला जातो, असे दिसून आले आहे. अभिनेत्री कंगना, भाजप नेते मोहित कंबोज, केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि आता राणा दांपत्याचा त्या यादीत समावेश झाला आहे.
राणा दांपत्य गेल्या दहा दिवसांपासून कोठडीत आहे
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.