आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैठकीत निर्णय:शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा होणार समावेश; शिक्षण-कृषी विभाग तयार करणार अभ्यासक्रम

मुंबई2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • विद्यार्थ्यांचे वय अन् बुद्धिमत्तेची सांगड घालणार

शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यात येणार अाहे. यासाठी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषद संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार आहेत. शिक्षणमंत्री प्रा. वर्षा गायकवाड आणि कृषिमंत्री दादा भुसे यांच्या उपस्थितीत बुधवारी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्याच्या विषयावर शिक्षणमंत्र्यांच्या मंत्रालयातील दालनात बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीस कृषिमंत्री दादा भुसे, राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांच्यासह शालेय शिक्षण विभागाच्या अपर मुख्य सचिव वंदना कृष्णा, कृषी विभागाचे सचिव एकनाथ डवले यांच्यासह वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते.

सध्या राष्ट्रीय शिक्षणात कृषी शिक्षणाचा सहभाग ०.९३ टक्के असून तो तीन टक्क्यांवर जाणे अपेक्षित आहे. कृषी विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश केल्यास या प्रस्तावामुळे कृषी शिक्षणाबद्दल विद्यार्थ्यांमध्ये ओढ निर्माण होईल, त्याशिवाय ग्रामीण भागात कृषी संशोधक तयार होऊन संशोधनाला चालना मिळेल, असे सांगून शेतीला प्रतिष्ठा निर्माण करून देण्यासाठी शालेय अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश होणे आवश्यक असल्याचे कृषिमंत्री दादा भुसे या वेळी म्हणाले. तर पर्यावरणाचा समतोल राखणे व जैवतंत्रज्ञानावर आधारित शेतीला चालना देण्याची गरज या शिक्षणामुळे निर्माण होईल, असे मत कृषी राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी मांडले.

हा आहे उद्देश
विद्यार्थ्यांच्या वयानुसार कृषि क्षेत्राशी निगडीत संदर्भ त्यांना शिकविण्यामुळे शास्त्रीय दृष्टिकोन निर्माण होऊन पीक उत्पादन पद्धतीत त्याचा उपयोग होऊ शकतो. नवी पिढी शास्त्रीय पद्धतीने शेती व्यवसाय करू शकेल, पर्यायाने उत्पादनात वाढ होण्यास मदत होऊ शकेल.

विद्यार्थ्यांचे वय अन् बुद्धिमत्तेची सांगड घालणार
कृषि विषयाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यामागे शेतकरी अणि शेतीप्रती कृतज्ञतेची भावना अाहे. शिक्षण व कृषि विभाग संयुक्तपणे अभ्यासक्रम तयार करणार असून विद्यार्थ्यांचे वय आणि त्याची बुद्धिमत्ता यांची सांगड घालून अभ्यासक्रम तयार करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.

बातम्या आणखी आहेत...