आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लसीकरणासाठी 'भाईजान'चा सहारा:राज्यातील मुस्लिम परिसरांमध्ये लोकांना जागरुक करण्यासाठी सलमान खानची मदत घेणार ठाकरे सरकार

मुंबई12 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्रात, राज्य सरकारच्या जनजागृती मोहिमेनंतरही, मुस्लिम भागात लसीकरण करणार्‍यांची संख्या वाढत नव्हती. आता राज्याच्या आरोग्य विभागाने 'भाईजान' म्हणजेच सलमान खानची मदत घेण्याचे ठरवले आहे. महाराष्ट्राचे आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणाले की, लोकांना लसीकरणासाठी प्रवृत्त करण्यासाठी सरकार बॉलिवूड अभिनेता सलमान खानची मदत घेईल.

टोपे म्हणाले, 'मुस्लीमबहुल भागात अजूनही काही संकोच आहे. मुस्लिम समाजाला लसीकरणासाठी राजी करण्यासाठी आम्ही सलमान खान आणि धार्मिक नेत्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे. धार्मिक नेत्यांचा आणि चित्रपट कलाकारांचा खूप प्रभाव असतो आणि लोक त्यांचे ऐकतात.'

लसीबाबतचे गैरसमज दूर करणे आवश्यक आहे
टोपे म्हणाले की, लसीकरणात महाराष्ट्र आघाडीवर आहे, मात्र काही भागात लसीकरणाचा वेग मंदावला आहे. लसीबाबत लोकांच्या मनात असलेल्या शंका निराधार आहेत. धार्मिक व्यक्तीला लसीची गरज नाही किंवा ही लस त्यांच्यासाठी फायदेशीर नाही असा विचार करणे ही अंधश्रद्धा आणि अज्ञान आहे. ते दूर करणे आवश्यक आहे. यासाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

राज्यात 10.25 कोटी लोकांचे झाले लसीकरण
टोपे म्हणाले की, राज्यात आतापर्यंत 10.25 कोटीहून अधिक लसीचे डोस देण्यात आले असून नोव्हेंबर अखेरीस सर्व पात्र व्यक्तींना किमान पहिला डोस मिळेल. कोरोनाची तिसरी लाट येण्याच्या शक्यतेबाबत टोपे म्हणाले की, तज्ज्ञांच्या मते साथीचे चक्र सात महिन्यांचे असले तरी मोठ्या प्रमाणात लसीकरणामुळे पुढील लाट तीव्र होणार नाही. ते म्हणाले की लोकांनी कोविड सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करावे आणि लसीकरण करावे.

दोन डोसमधील वेळ कमी करण्याचा प्रस्ताव
महाराष्ट्रात, लसीचा दुसरा डोस घेतलेल्या लोकांची संख्या सुमारे 35% आहे. म्हणजेच, लस घेण्यास पात्र असलेल्या 35% लोकांना दुसरा डोस मिळाला आहे. टोपे म्हणाले की, हा आकडा सुधारायचा असेल आणि लसीकरणाच्या मोहिमेला गती द्यायची असेल, तर कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करणे आवश्यक आहे. महाराष्ट्राने हा प्रस्ताव केंद्र सरकारला दिला आहे. त्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनाही आपले मत सांगितले आहे.

टोपे म्हणाले की, कोवॅक्सीनच्या दोन डोसमध्ये 28 दिवसांचा फरक आहे तर कोविशील्ड लसीच्या दोन डोसमधील फरक 84 दिवसांचा आहे. हे अंतर कमी करता येईल का? याबद्दल तज्ञांशी बोलणे आवश्यक आहे. यामध्ये IMCR आणि त्यावर संशोधन करणाऱ्या इतर संस्थांचे मत महत्त्वाचे ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...