आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराराज्यात १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू आहे. मात्र, लसींचा तुटवडा, केंद्रांवर होणारा गोंधळ लक्षात घेता आता १८ ते ४४ या वयोगटासाठीच्या वर्गीकरण (स्लाॅट) करून लसीकरणाचा मानस आहे. हे वर्गीकरण वयोगट किंवा सहव्याधीनुसार असेल, अशी माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी दिली. टोपे म्हणाले, तुटवड्यामुळे १८ ते ४४ वयोगटासाठी मोजक्या केंद्रांवरच लसीकरण सुरू असल्याने नागरिकांची गर्दी वाढली आहे. शहरांतील लाेक ग्रामीण भागात लस घेत आहेत. त्यामुळे ग्रामीण भागात अस्वस्थता आहे.
जोवर लस मुबलक प्रमाणात उपलब्ध होत नाही तोवर आपल्याला वर्गीकरण करावे लागेल. वयोगट वा सहव्याधीप्रमाणे विभागणी करता येईल. म्हणून ३५ ते ४४ या वयोगटातल्या लोकांना प्राधान्य देता येईल का? त्यातही सहव्याधी असलेल्यांना अधिक प्राधान्य देता येऊ शकेल. रशियाची स्पुटनिक व्ही लस महाराष्ट्रात मागवण्यासाठी चर्चा सुरू आहे. त्यांच्याशी लसीच्या दरांबाबत बोलणी सुरू आहेत”, असेही टोपे म्हणाले.
ऑक्सिजनसाठी ३८ पीएसए प्लँट कार्यान्वित
टोपे म्हणाले, हवेतून ऑक्सिजन निर्मितीसाठी राज्यात ३८ पीएसए प्लँट कार्यान्वित केले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी अशा प्लँटच्या १५० हून जास्त निविदा काढल्या आहेत. यातून ९५ ते ९८% शुद्धतेचा दैनंदिन ५३ मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध होऊ शकतो. यामुळे लिक्विड ऑक्सिजनची मागणी कमी होऊ शकते. आंतरराष्ट्रीय निविदेच्या माध्यमातून ३ लाख रेमडेसिविर लवकरच प्राप्त हाेणार आहेत.
तिसऱ्या लाटेची शक्यता गृहीत धरूनच नियोजन करा : उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे | कोरोनाच्या संभाव्य “तिसऱ्या लाटे’ची शक्यता गृहीत धरून आरोग्य विभागाने सतर्क राहावे. या लाटेत लहान बालके बाधित झाल्यास त्यांना आवश्यक ते उपचार वेळेत उपलब्ध करून देण्यासाठी योग्य नियोजन करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी प्रशासकीय यंत्रणेला शुक्रवारी दिले. पवार यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यातील कोरोना परिस्थिती आणि उपाययोजनांबाबत आढावा बैठक घेण्यात आली त्या वेळी ते बोलत होते.
बालरोगतज्ज्ञांचा टास्क फोर्स स्थापणार
तिसऱ्या लाटेत १८ वर्षे वयाच्या आतील मुलांना कोरोना संसर्गाचा अधिक धोका आहे. त्याची तयारी राज्याने चालवली असून आपण लवकरच बालरोगतज्ज्ञांचा राज्य टास्क फोर्सचे गठन करणार आहोत. लहान मुलांचे खाटा, त्यांचे अतिदक्षता विभाग, व्हेंटिलेटर्स, उपचार पद्धती यासंदर्भात या टास्क फोर्सचे मार्गदर्शन घेतले जाईल, असे मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.