आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काळ आला पण...:सुसाट मिनी टेम्पो रेल्वेफाटकाला धडकला! अन् तेवढ्यात धाड्-धाड् रेल्वे आली, थरारक व्हिडिओने चुकवला काळजाचा ठोका!

4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

ठाणे जिल्ह्यातील आसनगाव-आटेगाव दरम्यान असलेल्या रेल्वे क्रॉसिंगवर झालेला एक अपघात कॅमेऱ्यात कैद झाला आहे. येथे एक बेफाम येणारा मिनी टेम्पो गतिरोधक तोडून रेल्वे ट्रॅकच्या अगदी जवळ पोहोचला खरा, पण म्हणतात ना..काळ आला पण वेळ आली नाही अशीच स्थिती या व्हिडिओतून समोर आली आहे. हा थरारक व्हिडिओ पाहतानाही काळजाचा ठोका चुकतो.

झाले असे की, पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस (15066) ठाणे जिल्ह्यातील आसनगाव- आटेगाव येथील लोहमार्गावरून धाड्-धाड् जात होती. त्यावेळी रेल्वेफाटक लागलेले होते. एक्स्प्रेस रेल्वेफाटकाजवळ येण्याआधी अचानक एक मिनी टेम्पो वेगाने आला अन् रेल्वेफाटक तोडून मिनी टेम्पो पुढे निघतो न निघतो की धाड् धाड् करीत शिट्टी वाजवित एक्स्प्रेस येते अन् त्यानंतर काळजाचा ठोका चुकतो.

2 एप्रिलला सायंकाळी 5.30 वाजता झालेल्या या अपघाताचा व्हिडिओ आज समोर आला आहे. रेल्वे क्रॉसिंगवरच उभ्या असलेल्या कारमधून एका व्यक्तीने आपल्या मोबाईलमध्ये हे चित्रीकरण केले.

मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी ए. के. जैन यांनी सांगितले की, या अपघातानंतर आरपीएफच्या जवानांनी संशयित वाहन चालक विशाल विनोद ठाकूरला अटक केली आहे. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम 160B, 153, 174C, 146 आणि 147 नुसार गुन्हा नोंदविण्यात आला. या अपघातानंतर पनवेल-गोरखपूर एक्स्प्रेस सुमारे 16 मिनिटे खोळंबली होती. संशयित आरोपीचा ट्रकही जप्त करण्यात आला आहे.

व्हिडिओमध्ये नेमकं काय आहे?

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आसनगाव-आटागाव रेल्वे क्रॉसिंगचे दोन्ही फाटक बंद असल्याचे दिसते. समोर एक दुचाकीस्वार क्रॉसिंग उघडण्याची वाट पाहत उभा आहे. तेवढ्यात एक मिनी ट्रक भरधाव वेगाने रेल्वे क्रॉसिंगकडे येतो आणि फाटकाला धडकतो. दरम्यान, एक एक्स्प्रेस तेथून जाते. चांगली गोष्ट म्हणजे ट्रकची एक्स्प्रेसला टक्कर बसली नाही.

सोशल मीडियातून ट्रकचालकावर टीका

व्हायरल झालेला व्हिडिओ पाहून सोशल मीडिया यूजर्स ट्रक ड्रायव्हरवर टीका करीत आहेत. व्हिडिओ पाहून असे दिसते की ट्रक चालकाला फाटकाचा अडथळा दिसला नाही किंवा एक्सप्रेस येण्यापूर्वीच क्रॉसिंग ओलांडून पुढे जाण्याची गडबड असावी असे बोलले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...