आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराहोळीचा आनंद सगळीकडे साजरा होत असतांनाच फुगा लागल्याने एका सायकलस्वाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विरारमध्ये ही घटना घडली. रामचंद्र हरिनाथ पटेल (वय 54) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी अर्नाळा पोलिसांनी संबंधित दुचाकीस्वाराला ताब्यात घेतले आहे.
होळी साधेपणाने व खबरदारी घेऊन साजरी करा, असे आवाहन राज्य सरकारने केल्यानंतरही विरारमधील आगाशी चाळपेठ येथे काही जण गुरुवारी रस्त्यावर जाणाऱ्या लोकांना विनाकारण फुगे मारून आनंद साजरा करत होते. त्यामुळे मात्र रामचंद्र पटेल यांना जीव गमवावा लागला.
रामचंद्र पटेल यांचे बूटपॉलिशचे दुकान आहे. ते दुकान बंद करून सांयकाळी पाच वाजेच्या सुमारास विरारवरून चाळपेठच्या दिशेने जात असताना एका गाडीतून काही मुले फुगे मारत होते. यातील एक फुगा अर्नाळा ते विरारच्या दिशेने बाईकवरुन येणाऱ्या मुलांना लागला. अचानक फुगा लागल्याने बाईकस्वाराचे गाडीवरुन संतुलन बिघडले. त्यांचा वाहनावरील ताबा सुटला आणि सायकलवरील रामचंद्र यांना जाऊन ते धडकले.
या घटनेची माहिती मिळताच अर्नाळा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. रामचंद्र यांचा मृतदेह ताब्यात घेतला आणि दोन बाईकस्वारांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले. दरम्यान, बाईकस्वार तरूण असून ते अर्नाळ गावात राहतात. यासंदर्भात माहिती देताना अर्नाळा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजू माने यांनी फुगा लागल्याने अपघात झाला की नाही याबाबत शंका व्यक्त केली आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.