आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्राच्या राजकारणातील सत्तासंघर्षात सध्या मजेदार पात्रांनी एन्ट्री केली आहे. त्यात मामू, मुन्नाभाई, फेकू, कमळाबाई, शिल्लक सेना, चिऊ-सेना, मिंधेसेना अशा टोपणनावांचा वापर वेगाने वाढला आहे.
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड केले आणि शिंदेसेना विरुद्ध शिवसेना असा सामना रंगलेला दिसतोय. त्यात शिवराळ भाषेचा वापर मोठ्या प्रमाणात वाढलाय.
मामू अन् फेकू
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षात बॉलिवूड आणि महाभारतातील पात्रांच्या एन्ट्रीने लोकांचे भरपूर मनोरंजन होत आहे. सर्वच पक्ष एकमेकांच्या नेत्यांना टोपणनावे देऊन त्यांची खिल्ली उडवताना दिसतात. "मामू हे संबोधन फेकूपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटते...!" असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केले आहे. मात्र, एखाद्या नेत्याला किंवा पक्षाला टोपणनाव देऊन चिडवण्याची ही काही पहिलीच वेळ नाही.
कमळाबाई ते कौरव
शिवसेनाप्रमुख बाळ ठाकरे यांनी पक्षाच्या दसरा मेळाव्यात अनेकदा भाजपचा उल्लेख “कमळाबाई” असा केला होता. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात सत्तापरिवर्तन झाले. त्यानंतर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार यांनी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तुलना कर्णाशी केली. यासोबतच त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कृष्ण असे संबोधले. अशा प्रकारे अप्रत्यक्षपणे त्यांनी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला कौरव म्हणण्याचा प्रयत्न केला. गंमत म्हणजे भाजप आता ठाकरेंच्या शिवसेनेला ‘शिल्लक सेना’ म्हणते. केंद्रीय मंत्री नारायण राणे शिवसेनेला ‘चिऊ-सेना’ म्हणत चिडवतात. उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे अनेकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला “मिंधेसेना” म्हणत त्यांची खिल्ली उडवतात. टोपणनावे देऊन राजकीय हल्ले करण्याची प्रक्रिया इथेच संपत नाही.
व्यंगला सकारात्मक प्रतिसाद
गोरेगाव येथील पक्षाच्या गटप्रमुखाच्या मेळाव्यात शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी 'मनसे' अध्यक्ष राज ठाकरे यांना ‘मुन्नाभाई’ असे संबोधले. शिवसैनिकांनीही टाळ्यांच्या कडकडाटात या व्यंगला सकारात्मक प्रतिसाद दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या मनसेने उद्धव ठाकरेंना ‘मामू’ म्हणत प्रत्युत्तर दिले आहे. शिवसेनेच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी आता 'मनसे'ला प्रत्युत्तर दिले आहे. "मामू हे संबोधन फेकूपेक्षा अधिक विश्वासार्ह वाटते...!" असे त्यांनी सांगितले. निवडणूक जसजशी जवळ येईल तसतशी अशी नावे झपाट्याने वाढतील, असे मानले जात आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.