आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसला खिंडार पडणार?:अशोक चव्हाणांच्या भाजप प्रवेशाची जोरात चर्चा, पण स्वतः चव्हाण म्हणतात चर्चा बिनबुडाची

मुंबई24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र भाजपचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी गुरुवारी रात्री झालेल्या भेटीमुळे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे मराठवाड्यातील दिग्गज नेते अशोक चव्हाण यांच्या पक्षांतराच्या चर्चेने जोर पकडला आहे. काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी हे वृत्त खोडसाळपणाचे असल्याचे म्हटले असून फडणवीस यांनी “भेटलो पण राजकीय चर्चा झाली नाही’, असा खुलासा केला.

शिंदे सरकार अन भाजप यांच्यातील समन्वयक आशीष कुलकर्णी यांच्या वरळीतील निवासस्थानी अशोक चव्हाण यांनी गुरुवारी रात्री गणपती बाप्पांचे दर्शन घेतले. त्यादरम्यान देवेंद्र फडणवीस तेथे आले होते. दोघांची तेथे भेट झाली. या भेटीमुळे अशोक चव्हाण लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेने जोर धरला आहे.

चव्हाणांचा खुलासा

“गणपती दर्शनानिमित्त उभ्या-उभ्या भेट झाली, मात्र कोणतीही राजकीय चर्चा झाली नाही’, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.’अशोक चव्हाण यांच्या संदर्भातले वृत्त खोडसाळपणाचे आणि दिशाभूल करणारे आहे’, असा खुलासा काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी केला. ‘भारत जोडो यात्रेच्या तयारीसाठी मी उद्या दिल्लीला चाललो आहे. मी या आरोपांना कृतीतून उत्तर देईन. मला यावर काहीही बोलायचे नाही’, असे अशोक चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले.

चव्हाण यांची राजकीय परंपरा : चव्हाण यांचे वडील शंकरराव राज्याचे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. चव्हाण यांच्या पत्नी अमिता काँग्रेसच्या आमदार होत्या. स्वत: चव्हाण काँग्रेस खासदार होते. तसेच दोन वेळा राज्याचे ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत.

तेव्हा मुख्यमंत्रिपद गमावले : कारगिल युद्धातील हुतात्म्यांच्या विधवांसाठी बांधण्यात आलेल्या कुलाबा येथील आदर्श सोसायटीत नातेवाईकांना फ्लॅट दिल्याचा अशोक चव्हाणांवर आरोप झाला. परिणामी त्यांना २०२० मध्ये मुख्यमंत्रिपद गमवावे लागले. सीबीआय चौकशीत चव्हाण यांना क्लीन चीट मिळाली.

उलट-सुलट : गेली अनेक महिने चव्हाण यांच्या पक्षांतरांच्या चर्चा आहेत. चव्हाणांसोबत एकदोन आमदार साेडता काँग्रेसमधून कोणी जाणार नाही, असे काँग्रेसच्या एका ज्येष्ठ नेत्यांने सांगितले. राज्य सरकारचा मंत्रीमंडळ विस्तार अशोक चव्हाण यांच्या निर्णयामुळे लांबला आहे, सध्या बोलणी सुरू आहेत. ती पूर्ण झाल्यावर विस्तार होईल, असे भाजपातील सूत्रांनी सांगितले.

चर्चेला पुष्टी देणारे असेही योगायोग

१. २० जूनच्या विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला. हंडोरे यांच्या पराभवाच्या संशयाची सुई अशोक चव्हाण व समर्थक आमदारांकडे गेली.

२. ४ जुलै रोजीच्या शिंदे सरकारवरील विश्वासदर्शक ठरावाच्या वेळी अशोक चव्हाण यांच्यासह काँग्रेसचे ११ आमदार गैरहजर राहिले होते. ट्रॅफिकमध्ये अडकल्याचे कारण तेव्हा त्यांनी दिले होते.

३. विश्वासदर्शक ठरावावेळी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत बोलताना “आमच्या पाठीशी काही अदृश्य हात आहेत’ असे सूचक विधान काँग्रेसच्या गैरहजर राहिलेल्या गटांविषयी केले होते.

४. २१ ऑगस्टला शिंदे सरकारातील कृषिमंत्री व पूर्वाश्रमीचे चव्हाणांचे कट्टर समर्थक अब्दुल सत्तार हे नांदेड येथे अशोक चव्हाण यांना त्यांच्या निवासस्थानी भेटले होते.

बातम्या आणखी आहेत...