आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोरोनाने मुंबईत पुन्हा डोके वर काढले आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कोरोनाची तिसरी लाट येत असल्याचे सांगितले आहे. गेल्या आठवडाभरात मुंबईत कोरोनाची 2939 प्रकरणे समोर आली आहेत. ऑगस्टच्या पहिल्या आठवड्याची यासोबत तुलना केल्यास त्यावेळी 2413 नवीन प्रकरणे होती. अर्थातच या ठिकाणी कोरोना रुग्णांमध्ये साप्ताहिक 18 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली.
पुढील 15 दिवस अतिशय महत्वाचे आहेत असे मुंबई महानगरपालिकेने सांगितले आहे. ऐन गणेशोत्सवात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने गणेश मंडपांमध्ये भक्तांच्या एंट्रीवर बंदी लावण्यात आली आहे. राजधानीसह उपराजधानी नागपुरात सुद्धा अशीच परिस्थिती आहे. या ठिकाणी वाढत्या कोरोना रुग्णांची संख्या लक्षात घेता दुकानांच्या वेळेत बदल करण्यात आले. आता संध्याकाळी केवळ 4 वाजेपर्यंतच दुकाने सुरू ठेवता येतील.
सप्टेंबरमध्ये रोज सरासरी 400 पेक्षा अधिक रुग्णांची नोंद
मुंबईत मंगळवारी 349 नवीन रुग्ण सापडले तर 5 जणांचा मृत्यू झाला. यासोबतच राजधानीत कोरोनाच्या एकूण रुग्णांची संख्या 7,46,725 आणि कोरोनामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या 15,998 झाली. या महिन्यात पहिला सोमवार वगळता 1 सप्टेंबरपासून रोज 400 पेक्षा अधिक नवे रुग्ण सापडत आहेत. त्यानुसार, 7 सप्टेंबर रोजी सक्रीय रुग्णांची संख्या 3400 वरून 3,718 झाली. पुण्यातील परिस्थिती पाहता या ठिकाणी रोज सरासरी 240 च्या घरात नवे रुग्ण सापडत आहेत.
घरातच राहून गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी लोकांना घरातच राहून गणेशोत्सव साजरे करण्याचे आवाहन केले आहे. 'माझे घर, माझा बाप्पा' आणि 'माझे गणेश मंडळ, माझे बाप्पा' यानुसार घरातच गणेशोत्सव साजरे करा. गणेश मंडपांमध्ये कोरोना प्रोटोकॉलचे पालन केले जाणार असे आश्वासन गणेश मंडळांनी दिले आहे. त्यानुसार, संपूर्ण कामकाज मंडळातील 10 जण करतील असेही त्या पुढे म्हणाल्या.
कोरोनाच्या वाढत्या रुग्णांच्या पार्श्वभूमीवर बृहन्मुंबई महानगरपालिकेने एक आदेश काढला होता. त्यानुसार, गणेश मंडपांमध्ये भक्तांचा प्रवेश बंद करण्यात आला आहे. आयोजकांनी ऑनलाइन माध्यमातून दर्शनाची व्यवस्था करावी असे सांगण्यात आले आहे. यासाठी सोशल मीडिया आणि वृत्तवाहिन्यांची मदत घेता येईल.
महाराष्ट्रात कोरोनाची परिस्थिती
महाराष्ट्रात गेल्या 24 तासात कोरोनाचे 3,898 नवीन रुग्ण सापडले आहेत. याच दरम्यान 86 लोकांचा जीव गेला. राज्यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 64 लाख 93 हजार 698 झाली आहे. तर मृतांचा आकडा 1,37,897 वर पोहोचला आहे. दरम्यान, धुळे, नंदुरबार, हिंगोली, अकोला, अमरावती, यवतमाळ, वर्धा आणि भंडारा इत्यादी जिल्ह्यांसह परभणी आणि अमरावती शहरांत कोरोनाचा एकही नवीन रुग्ण सापडलेला नाही.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.