आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ठाकरे सरकारवर टीकास्त्र:'हे सरकार नाही CIRCUS आहे', नितेश राणेंची महाविकास आघाडीवर सरकारवर खोचक टीका 

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून 2 जुलै रोजी मुंबईतील 10 पोलिस उपायुक्तांच्या करण्यात आलेल्या बदल्या रविवारी गृह विभागाने तडकाफडकी रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गृह विभागाने या बदल्या रद्द केल्या, असे सांगितले जाते. मात्र, बदल्यांमागील राजकारणामुळे मुंबई पोलिस दलात संभ्रम पसरला आहे. तसेच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप आमदार नितेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका केली आहे.

'नगरविकास मंत्रालयातील बदल्या नव्हे तर फेरफार (आघाडी सरकारच्या भाषेत ) मंत्र्यांच्या संमतीशिवाय? DCP च्या बदल्या झाल्यावर गृहमंत्र्यांना कळते? मात्र काँग्रेसचे महसूल आणि PWD मंत्र्यांना बदल्या करण्यास मनाई? हे खरंच सरकार नाही CIRCUS आहे,' असं म्हणत नितेश राणे यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.

रविवारी सुटी असताना मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी बदली रद्दचे आदेश जारी केले. त्यात त्यांनी 10 पोलिस उपायुक्तांनी नवीन ठिकाणचा पदभार सोडावा आणि पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट केले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. या दहा पोलिस उपायुक्तांमध्ये बहुतांश आयपीएस आहेत. 2 जुलै रोजीच्या बदल्यांची कल्पना मुख्यमंत्र्यांना नव्हती. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला चाप लावल्याचे सांगितले जाते. गृहविभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने संयुक्तपणे बदल्या रद्द केल्या आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मात्र, झालेल्या बदल्या या गृहमंत्र्यांच्या संमतीने झाल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, सरकारमध्ये समन्वय ठेवण्याची सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सत्ताधारी आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

बातम्या आणखी आहेत...