आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानाशिक पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत सत्यजित तांबे यांना उमेदवारी नाकारल्यावरून काँग्रेसमध्ये सुरू असलेला अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. आधी स्वत: सत्यजित तांबे यांनी पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी हेतुपुरस्सर आपल्याला पक्षाची उमेदवारी दिली नसल्याचा आरोप केला होता. पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील यांच्याबद्दलही नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर सत्यजित तांबे यांचे मामा व ‘राजकीय गॉडफादर’ माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनीही थेट काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांना पत्र पाठवून पटोलेंच्या मनमानी कारभाराविरोधात तक्रार केली आहे. विशेष म्हणजे पक्षातील काही नेत्यांनी थोरातांच्या भूमिकेला समर्थन देणारी वक्तव्ये केली आहेत. दुसरीकडे, नाशिकच्या निवडणुकीत थोरातांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारासाठी काम केले नसल्याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी गेल्या आहेत. त्यामुळे थोरातांचे विधिमंडळ नेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे, अशी माहिती काँग्रेसमधील सूत्रांनी दिली.
पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील मुंबईत येऊन घेणार नेत्यांकडून आढावा
आता पटोले यांच्यासोबत काम करणे मला शक्य नाही : थोरात
प्रदेशाध्यक्ष पटोले पक्षातील निर्णय घेताना मला विश्वासात घेत नाहीत. नाशिक निवडणुकीबाबत उमेदवारीचा निर्णय घेतानाही विचारले नव्हते. इतकेच नव्हे तर या निवडणुकीत काही नेत्यांनी मला बदनाम करण्याचाही प्रयत्न केला. त्यांच्या मनात माझ्याविषयी इतकाच राग असेल तर आपल्याला यापुढे त्यांच्यासोबत काम करणे शक्य नाही, अशी नाराजी खरगेंना पाठवलेल्या पत्रात थोरात यांनी व्यक्त केल्याची माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.
थोरात आमचे नेते, त्यांच्याविरुद्ध मी कधीच बोललो नाही : पटोले
बाळासाहेब थोरात हे आमचे नेते आहेत. त्यांनी पत्र लिहिले असेल असे मला वाटत नाही. मी कधीच त्यांच्याविरोधात बोललो नाही. नाशिक पदवीधर निवडणुकीत झालेल्या सगळ्या प्रकरणावर पक्षाच्या पातळीवर चर्चा व्हावी यासाठी म्हणून १३ फेब्रुवारी रोजी मी प्रदेश कार्यकारिणीची बैठक ठेवली आहे. हा आमच्या घरातील प्रश्न आहे, त्यावर चर्चा केली जाईल, असे पटोले म्हणाले. दरम्यान, पक्षाचे प्रभारी एच.के. पाटील हे या बैठकीत आढावा घेतील.
नाना पटोलेंच्या नेतृत्वाला विदर्भातूनही मोठा विरोध
पटोले यांना प्रदेशाध्यक्ष केल्यापासूनच काँग्रेसमध्ये जुने-नवे असे गटतट निर्माण झाले आहेत. विदर्भातील काही नेतेही त्यांच्यावर नाराज आहेत. यापूर्वीच्या नागपूर विधान परिषद निवडणुकीतही भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांच्याविरोधात छोटू भोयरांना उमेदवारी देण्याचा पटोलेंच्या निर्णयाला विरोध झाला होता.
आता तांबेंच्या प्रकरणावरून या नेत्यांनी पुन्हा पटोलेंविरुद्ध तक्रार केल्याची माहिती आहे. दरम्यान, ज्या तक्रारी असतील त्याची बाहेर वाच्यता न करता पक्षाच्या प्लॅटफॉर्मवरच व्हायला हवी, अशी अपेक्षा माजी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली.
आम्ही नाना पटोलेंसोबत; अशोक चव्हाणांचा थोरातांच्या भूमिकेला विरोध
मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम म्हणाले, ‘तांबे हे योग्य आहेत की अयोग्य याची चौकशी होण्याची गरज आहे. निवडणुकीसाठी योग्य “एबी' फॉर्म पोहोचला होता की नाही, यात काही षड्यंत्र आहे का? याचीही तपासणी व्हायला हवी.’ तर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, ‘ थोरात आमचे नेते आहेत. पण आता आम्ही सर्व पटोलेंसोबत आहोत.’
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.