आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

संयम सुटला:वांद्रा : लॉकडाऊन-2 ची घोषणा होताच सैरभैर झालेले हजारो परप्रांतीय मजूर रस्त्यावर

मुंबईएका वर्षापूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
मजूर जमलेल्या ठिकाणी चपलांचा असा खच पडला होता.  - Divya Marathi
मजूर जमलेल्या ठिकाणी चपलांचा असा खच पडला होता. 
  • जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांचा सौम्य लाठीमार
  • गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले चौकशीचे आदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी सकाळी लॉकडाऊन वाढवण्याची घोषणा करताच हातावर पोट असणाऱ्या मुंबईतील हजारो परप्रांतीय मजुरांनी सायंकाळी रस्त्यावर येत विरोध दर्शवला. आम्हाला अन्न द्या, नाहीतर घरी तरी जाऊ द्या, अशी मागणी हे मजूर करत होते. या वेळी पोलिसांनी गर्दी केल्यास कोरोनाचा संसर्ग होईल, अशी समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तरीही जमाव एेकण्याच्या मन:स्थितीत नसल्याने अखेर सौम्य लाठीमार करत या मजुरांना पांगवण्यात आले.

प. वांद्रे उपनगरातील पटेल नगरी झोपडपट्टीत उत्तर प्रदेश व प. बंगालमधील मजुरांची वस्ती आहे. जामा मशिदीबाहेर पटांगणात दुपारी तीनच्या सुमारास अचानक सुमारे ४ हजार मजूर जमले. आम्हाला अन्न द्या, अन्यथा घरी जाऊ द्या, अशा घोषणा हे मजूर देत होते. पोलिसांनी समजूत घालण्याचा प्रयत्न केला. शेवटी सौम्य लाठीमार करत जमावाला पांगवण्यात आले. दरम्यान, मजुरांसाठी विशेष रेल्वे येणार असल्याची अफवा कुणी पसरवली, याच्या चौकशीचे आदेश गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिले. 

६.६ लाख परप्रांतीय निवारा केंद्रात

राज्याच्या सीमावर्ती भागात ६ लाख ६० हजार परप्रांतीय मजूर सरकारी निवारा केंद्रात आहेत. वांद्रेप्रमाणे या मजुरांचा संयम सुटू नये, याची खबदारी जिल्हा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. अन्यथा कायदा सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान राज्यासमोर उभे राहू शकते.

रेल्वेचा खुलासा

३ मे पर्यंत कुठल्याही प्रवासाचे रेल्वेकडून आरक्षण करण्यात येणार नाही. तिकीट खिडक्यासह आगाऊ आरक्षणसुद्धा बंद राहील, असा खुलासा मध्य व पश्चिम रेल्वेने वांद्रे येथील मजुरांच्या उद्रेकाच्या घटनेनंतर केला आहे.

कराड : क्वाॅरंटाइन केलेल्या २१ परप्रांतीयांचे पलायन

सातारा : प्रशासनाने कराड तालुक्यातील आटके येथे क्वाॅरंटाइन केलेल्या २१ तामिळ नागरिकांनी पोलिसांचा डोळा चुकवून पलायन केल्याचा प्रकार सोमवारी रात्री घडला. पुणे-बंगळुरू महामार्गावरून पायी चालत जाणाऱ्या तामिळनाडूच्या २१ नागरिकांसह सुमारे १०० लोकांना महसूल विभागाने एका हॉलमध्ये क्वाॅरंटाइन केले होते. त्यांच्या बंदोबस्तासाठी रात्रंदिवस पोलिसांचा पहारा होता. सोमवारी  सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास यातील २१ जण हॉलच्या पाठीमागील भिंतीवरून उडी मारून पसार झाले. 

  • सत्ताधारी-विरोधकांना राजकारणाचा व्हायरस

मंत्री आदित्य ठाकरे अाणि देवेंद्र फडणवीस यांच्यात वाक््युद्ध 

‘या मजुरांची योग्य व्यवस्था होत नव्हती. कार्ड नसणाऱ्यांना धान्य दिले पाहिजे,’ असे आम्ही सरकारला केव्हापासून सांगतो आहोत, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

त्यावर ‘आम्ही साडेसहा लाख परप्रांतीय मजुरांना सांभाळतो आहोत. या मजुरांना धान्य नकोय, त्यांना त्यांच्या घरी जायचे आहे,’ असे प्रत्युत्तर आदित्य ठाकरेंनी दिले.

अफवा पसरवली : सचिन सावंत

मजुरांसाठी वांद्र्याहून रेल्वे सोडली जाणार असल्याची अफवा पसरवण्यात आली होती. सोमय्यांसारखे भाजप नेते अशा अफवा पसरवून गोंधळात भर घालत आहेत, असा आरोप प्रदेश काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 

‘ते’ सुटणार नाहीत : मुख्यमंत्री

‘रेल्वेची अफवा पसरवली गेली. त्यामुळे मजूर जमले. आपल्याकडे आगीचे बंब भरपूर आहेत. पण, अफवा पसरवणारे कोणी का असेना ते सुटणार नाहीत’. - उद्धव ठाकरे, मुख्यमंत्री

समजूत घालून घरी पाठवले 

लाॅकडाऊनच्या निराशेतून हे मजूर रस्त्यावर आले असावेत. परंतु, पोलिसांनी त्यांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी परत पाठवले आहे.  - अनिल देशमुख, गृहमंत्री

आदित्य ठाकरेंचे ट्विट

केंद्र सरकारने स्थलांतरित कामगारांची स्वगृही जाण्याची व्यवस्था न करणे हेच वांद्र्यातील परिस्थिती आणि सुरतमध्ये उसळलेल्या दंगलीमागील कारण आहे.

चंद्रकांत पाटलांचे ट्विट

राज्यातील महाविकास आघाडी सरकारने गरीब कुटुंबे, परराज्यांतील मजूर आणि कामगारांची निवाऱ्याची व्यवस्था, त्यांना रेशनवर धान्य मिळण्याची व्यवस्था आणि भोजनाची सोय केली असती तर ही गर्दी झाली नसती.

अनुत्तरित प्रश्न

परराज्यातील रेल्वे गाड्या वांद्रे टर्मिनसहून सुटत असताना वांद्रे पश्चिम येथे हा जमाव कसा जमला? ठीक चार वाजताच जमण्याचा संदेश कोणत्या संघटनांद्वारे पसरवण्यात आला? संचारबंदी व नाकेबंदी लागू असताना एवढ्या हजारोंच्या संख्येने जमलेल्यांना पोलिसांनी का अडवले नाही?

  • ‘खाना दो या हमे घर भेजो’ या घोषणांना कुणी सुरुवात केली?

आम्हाला अन्न द्या, अन्यथा घरी तरी जाऊ द्या, अशी घोषणाबाजीही

दहा दिवसांपूर्वीही आंदोलन : दहा दिवसांपूर्वी या मजुरांनी असेच आंदोलन केले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे निवासस्थान असलेल्या वांद्रे परिसरात झोपडपट्ट्यांचे प्रमाण अधिक आहे. या मजुरांनी लाॅकडाऊनचे २१ दिवस कसेबसे काढले. मंगळवारी पुन्हा १९ दिवसांचा लाॅकडाऊन जाहीर झाल्याने या मजुरांचा संयम संपला.

बातम्या आणखी आहेत...