आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Local
  • Maharashtra
  • Mumbai
  • BJP's Plan To Eliminate The Opposition In Maharashtra? Played By Eknath; Shiv Sena, MNS Along With NCP And Congress Displeased Shinde Fadnavis

विरोधक संपवण्याचा डाव?:एकनाथांच्या आडून भाजपची खेळी; शिवसेना, मनसेसह राष्ट्रवादी अन् काँग्रेसचे नाराज संपर्कात

मयुर वेरूळकर । मुंबई8 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

घराणेशाही असलेले प्रादेशिक राजकीय पक्ष संपतील, राष्ट्रीय राजकारणात केवळ एकच पक्ष उरेल. तो म्हणजे भाजप, असे वक्तव्य करून भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा एकच राळ उडवून दिली. विशेष म्हणजे शिंदे गटात होत असलेले प्रवेश, विरोधी पक्षातील नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या बातम्या, यामुळे नड्ड्यांच्या वक्तव्याला बळ मिळत आहे. एकनाथ शिंदेंच्या ऐतिहासिक बंडानंतर आता राज्यातील महापालिका निवडणुकांच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात पक्षांतर होण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

असे पडले खिंडार

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा काल परवाच औरंगाबाद दौरा झाला. यावेळी शिवसेना नेते अर्जुन खोतकर, काँग्रेसचे माजी विधान परिषद सदस्य तथा शिवसेनेचे माजी मंत्री सुरेश नवले यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा शिवसेनेचे माजी खासदार सुरेश जाधव यांनी नुकताच शिंदे गटामध्ये प्रवेश केला. तर काल सकाळीच मनसेला खिंडार पडले. काही दिवसांपूर्वीच अमित राज ठाकरेंनी रायगड जिल्ह्याचा दौरा केला. त्यांनतर मात्र, काल मनसेच्या जवळपास 100 पदाधिकाऱ्यांनी मनसेला सोडचिठ्ठी देत शिंदेंचे नेतृत्व स्वीकारले आहे.

मुख्यमंत्री शिंदेंचे औरंगाबाद दौऱ्यात शक्तिप्रदर्शन
मुख्यमंत्री शिंदेंचे औरंगाबाद दौऱ्यात शक्तिप्रदर्शन

यामध्ये मनसेचे माजी रायगड जिल्हा अध्यक्ष अतुल भगत यांच्यासह माजी खारघर शहर प्रमुख प्रसाद परब हे देखील शिंदे गटात दाखल झाले. उरण आणि पनवेलमधील मनसे खारघरची पूर्ण टीम शिंदे गटात दाखल झाल्याने मनसेला मोठा धक्का मानला जात आहे. यानंतर मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांनी देखील मोहित कंबोज यांची भेट घेतल्याने ते नवी वाट चोखाळत आहेत की काय, असा सवालही राजकीय वर्तुळात उपस्थित केला जात आहे

राष्ट्रवादीचे नेतेही संपर्कात

राष्ट्रवादी काँग्रेसच्या सोलापूर जिल्ह्यातील अंतर्गत वादामुळे आमदार बबनराव शिंदे आणि माजी आमदार राजन पाटील हे देखील शरद पवारांची साथ सोडत भाजपप्रवेश करण्याची शक्यता आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी दिल्ली येथे जात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे खासदार निंबाळकर यांची भेट घेतली होती. यावेळी आताच काही बोलणार नाही. योग्य वेळी बोलू, असे सूचक वक्तव्य माढ्याचे खासदार रणजितसिंह निंबाळकर यांनी केले होते. मनपाच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवत भाजपकडून राज्यातील मविआतील घटक पक्षांसह मनसेला खिळखिळे करण्याची रणनीती तयार करण्यात आली आहे, असे गेल्या काही दिवसात घडलेल्या घटनांमधून दिसून आले आहे.

मोहित कंबोज चर्चेत

राज ठाकरेंच्या भोंगा विरोधावेळी भोंगे वाटप करणार, अशी घोषणा करून मोहित कंबोज हे चर्चेत आले होते. त्यानंतर राज्यात झालेल्या सत्ताबदलाच्या राजकीय नाट्यात मोहित कंबोज यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली होती. बंडखोर आमदारांना पहिले सुरत तर नंतर गुवाहटीच्या हॉटेलमध्ये नेण्यात आले. यावेळीही भाजपचे नेते मोहित कंबोज दिसून आले होते. यामुळे सध्या मोहित कंबोज आणि माजी मंत्री संजय कुटे यांच्यावर राज्यातील विरोधकांना हेरण्याचे काम देण्यात आल्याचे दिसून येत आहे. मुंबईचे माजी पालकमंत्री अस्लम शेख यांचे असलेले वलय लक्षात घेत त्यांचा भाजप किंवा शिंदे गटात समावेश करण्याचा मानस कंबोजाचा असल्याचा दिसून येत आहे.

मुंबईत कुठे बसणार धक्का?

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाणे मनपातील शिवसेनेच्या 67 पैकी 66 नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. यामुळे जवळपास शिवसेनेला ठाण्यात शुन्यापासून सुरुवात करावी लागणार आहे. तर नवी मुंबई पालिकेतील 38 पैकी 28 माजी नगरसेवकांनी शिंदेंचे नेतृत्व स्वीकारत ठाकरेंचे शिवबंधन काढून टाकले आहे. तर केडीएमसीचे 55 पेक्षा जास्त नगरसेवक शिंदे गटात दाखल झाले आहेत. पुण्यातील हडपसर भागातील सेना नगरसेवक नाना भानगिरे यांची शिंदेंनी शहर प्रमुख म्हणून नियुक्ती केली आहे. पुण्यात शिवसेनेला अजून धक्का बसला नसला तरी मोठ्या प्रमाणात झटका देणार असा दावा भानगिरेंनी दिला आहे. तर अजूनही मुंबईतील नगरसेवकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची साथ सोडलेली नाही. मात्र, मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी खासदार राहुल शेवाळे आणि आमदार सदा सरवणकर, मंगेश कुडाळकर, प्रकाश सुर्वे, यामिनी जाधव, दिलीप लांडे यांच्यावर मुंबईतील नगरसेवकांना शिंदे गटात आणण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती आहे.

माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात
माजी मंत्री सुरेश नवले शिंदे गटात

आदित्य यांची एकाकी झुंज

सर्व घडामोडींदरम्यान एकीकडे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांचेही राज्यभरात दौरे सुरू आहेत. बंडखोरांनी केलेल्या गद्दारीची आठवण ते आपल्या आपल्या समर्थकांना विविध मतदारसंघांत फिरून देत आहेत. त्यांच्या या दौऱ्यांना भरभरून प्रतिसादही मिळत आहे. यामुळे शिवसेनेचा समर्थक मतदार आगामी निवडणुकांतही शिवसेनेलाच साथ देईल की स्थानिक बंडखोर नेत्यांची निवड करील हा प्रश्न आहे.

अजित पवारांचेही राज्यात दौरे

राज्यातील अतिवृष्टीग्रस्त भागांची पाहणी करण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही राज्यभरात दौरे केले. या दौऱ्यांच्या निमित्ताने राज्यभरातील पक्षाच्या कार्यकर्त्यांना एकजूट करण्याचे कामही त्यांच्याकडून सुरू आहे. निवडणुकांच्या तोंडावर होणारी पक्षांतरे राष्ट्रवादीला नवीन नाहीत, तरीही पक्षाची बांधणी पक्की करून घेण्याचे काम राष्ट्रवादीकडून केले जात आहे.

बातम्या आणखी आहेत...