आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेसच्या नाराजीचा फटका:राज्यसभेच्या सहा जागांचे गणित सुटेना आघाडी-भाजपच्या पडद्याआड वाटाघाटी

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

राज्यसभेच्या ६ जागांच्या निवडणुकीची जोरदार तयारी भाजप आणि महाविकास आघाडी करत आहे. शुक्रवारी (३ जून) अर्ज माघारी घेण्याचा अंतिम दिवस आहे. सातव्या उमेदवारामुळे बहुचर्चित ठरलेली निवडणूक होणार की बिनविरोध निवडी पार पडणार, याविषयीचा कल काही तासांत स्पष्ट होणार आहे. दरम्यान, राज्यातील काँग्रेस नेते-पदाधिकाऱ्यांच्या नाराजीचा फटका ‘बाहेरचे’ उमेदवार इम्रान प्रतापगढी यांना बसू शकतो, असे सांगितले जात आहे.

६ जागांसाठी येत्या १० जूनला मतदान होणार असून दोन अपक्षांसह एकूण ९ उमेदवार रिंगणात आहेत. शिवसेना व भाजप यांच्यापैकी कोण उमेदवारी मागे घेणार यावर एकमत होत नाही. निवडणूक अटळ असल्याचे गुरुवारचे चित्र होते. शिवसेनेला आपला दुसरा उमेदवार जिंकून आणण्यासाठी अपक्षांची मनधरणी करावी लागत आहे. शिवसेनेने संभाजी छत्रपती यांना उमेदवारी नाकारली आहे. आता ऐनवेळी संजय पवार यांची उमेदवारी शिवसेनेने मागे घेतल्यास छत्रपतींविषयी दुजाभाव केला म्हणून मराठा समाजाचा रोष ओढवण्याची भीती सेना नेतृत्वाला आहे.भाजपला ३ उमेदवार निवडून आणण्यासाठी १५ मते कमी पडतात. काही अपक्षांना भाजपने आपल्या बाजूने वळवण्यात यश मिळवले असल्याचे समजते. अपक्षांनी मतपत्रिका दाखवल्यास त्यांचे मते बाद होऊ शकते, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. त्यामुळे भाजप हा अपक्ष आमदारांची मते बाद होतील, अशी खेळी करण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

इम्रान प्रतापगढी अडचणीत : १९९८ मध्ये काँग्रेस आमदारांनी क्राॅस व्होटींग केले होते. त्यामुळे राम प्रधान यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. काँग्रेसकडे काठावर बहुमत आहे. काँग्रेसचे काही आमदार क्राॅस व्होटींग करु शकतात. तसे झाल्यास काँग्रेस उमेदवार इमरान प्रतापगढी पहिल्या फेरीत जिंकू शकणार नाहीत. परिणामी भाजपच्या तिसऱ्या उमेदवारास दुसऱ्या क्रमांकाच्या मतांचा लाभ होईल, असे गणित सांगितले जाते.

सेनेच्या दुसऱ्या उमेदवाराच्या विजयाची जबाबदारी एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. शरद पवार यांनी राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची रात्री बैठक घेत महत्वाच्या सूचना दिल्या. काँग्रेसचे सर्व आमदार शिर्डी येथे असून प्रभारी एच. के. पाटील निवडणुकीचे नियोजन करत आहेत. निवडणूक होऊ द्यायची की बिनविरोध निवडी याची कळ भाजपकडे म्हणजेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हाती आहे.

बातम्या आणखी आहेत...