आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विधान परिषद निवडणूक:उद्या लक्ष्य अपक्ष; 13 अपक्ष, 16 छोट्या पक्षांना भाव

मुंबई13 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

दहा जूनला झालेल्या राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडी संयुक्तपणे लढली होती. त्यात सेनेच्या उमेदवाराचा पराभव झाल्याने २० जूनच्या विधान परिषदेच्या मतदानाला आघाडी स्वतंत्रपणे सामोर जात आहे. आपली अतिरिक्त मते सहयोगी पक्षाला देण्यास आघाडीचे घटक पक्ष तयार नसल्याने आघाडीत मोठा संभ्रम आहे. त्यामुळे १३ अपक्ष व छोट्या पक्षांच्या १६ अशा २९ आमदारांचा भाव या निवडणुकीत चांगलाच वधारला आहे. चारही पक्षांनी आपल्या आमदारांना शनिवारी मुंबईत हाॅटेलमध्ये सुरक्षित ठेवले. १० जागांसाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. भाजपचे प्रसाद लाड, काँग्रेसचे भाई जगताप यांच्यात दहाव्या जागेसाठी लढत असून एकाचा पराभव अटळ असून विजयासाठी २६ मते आवश्यक आहेत.

या निवडणुकीला २८५ आमदार मतदार असून प्रत्येक उमेदवारास विजयासाठी २६ मते हवी आहेत. केंद्रीय तपास यंत्रणा आमदारांना धमकावत आहेत, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर केला. तर पराभवानंतर वाचायची ही काँग्रेसची स्क्रिप्ट आहे, असा पलटवार भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केला. अपक्षांना सन्मानाने मते मागणे गैर नाही. ज्याला २६ आकडा गाठता येणार नाही तो पराभूत होणार आहे. त्याविषयीचा चमत्कार सोमवारी दिसेलच, असे राष्ट्रवादीचे नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. तसेच राष्ट्रवादीकडून अपक्षांना फोन गेले होते, हे अजित पवार यांनी मान्य केले. दरम्यान, भाई जगताप यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. राष्ट्रवादीच्या सहयोगी आमदारांची मते देण्याची त्यांनी विनंती केली. दररम्यान, बविआचे हिंतेद्र ठाकूर यांच्याकडे ३ मते आहेत. शनिवारी दिवसभर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी त्यांची भेट घेतली. मात्र, त्यांचा मुलगा व आमदार क्षितीज ठाकूर हे परदेशात असल्याने ते मतदानाला येतील की नाही ? हे अजूनही गुलदस्त्यातच आहे.

२८ चा कोटा करण्यावर पक्षांचा भर : विजयासाठी २६ मते आवश्यक आहेत. मात्र, काही मते बाद झाल्यास उमेदवाराला धोका होऊ शकतो. त्यामुळे २८ चा कोटा करण्यावर सर्वच पक्षांचा भर आहे. हे गुप्त मतदान असल्याने पक्षातील मते फुटू नयेत याकडे लक्ष दिले जात आहे. आक्षेप घेऊन मते बाद करण्याचा विरोधकांचा प्रयत्न असतो. त्यामुळे काटेकोर नियमात मतदान करण्याचे धडे शनिवारी सर्वच पक्षांनी आमदारांना दिले.

विजयासाठी सर्वच उमेदवारांना २६ मते मिळवणे आवश्यक
भाजप : तीन अपक्ष हॉटेलात दाखल
भाजपचे प्रसाद लाड डेंजर झोनमध्ये आहेत. शनिवारी रात्री आमदारांना देवेंद्र फडणवीसांनी मार्गदर्शन केले. या वेळी राजा राऊत, प्रकाश आवाडे, महेश बालदी हे अपक्ष आमदार रात्रीच्या बैठकीला हजर होते.

शिवसेना : मते काँग्रेसला देणार का ?
सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे उमेदवार आहेत. सेनेकडे ५५ मते असून ७ सहयोगी आमदार आहेत. सेना आपली अतिरिक्त मते काँग्रेसला देणार की स्वत:च्या उमेदवारांना कोटा वाढवून देणार, याची उत्सुकता आहे.

काँग्रेस : भाई जगतापांना हवीत ८ मते
चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप हे दुसरे उमेदवार आहेत. काँग्रेसकडे ४४ आमदार असून दुसऱ्या उमेदवारास ८ मते आवश्यक आहेत. काँग्रेसचे सर्व आमदार वरळीच्या हाॅटेल फोर सीझनमध्ये शनिवारी दाखल झाले आहेत.

राष्ट्रवादी : भुयार, शिंदे, जोरगेवार बैठकीला
राष्ट्रवादीचे रामराजे नाईक-निंबाळकर आणि एकनाथ खडसे हे दिग्गज उमेदवार आहेत. राष्ट्रवादीकडे ५१ संख्याबळ आहे. देवेंद्र भुयार, संजय शिंदे, किशोर जोरगेवार हे तीन अपक्ष रात्रीच्या बैठकीला होते.

रवी राणांना वॉरंट
अपक्ष आमदार रवी राणा यांना अमरावतीच्या शाईफेक प्रकरणात हायकोर्टाने शनिवारी अटक वॉरंट काढले. मात्र,ते पोलिसांना सापडले नाही. याकडेही सर्वांचे लक्ष आहे.

छोटे पक्ष कुणाकडे
एमआयएम, समाजवादी, रासप, शेकाप तसेच बहुजन विकास आघाडीचे ९ आमदार आहेत. हे छोटे पक्ष प्रसाद लाड आणि काँग्रेसचे भाई जगताप यांचा फैसला करणार आहेत.

बातम्या आणखी आहेत...