आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अंधेरी पूर्व पोटनिवडणूक:मशाल भडकली, अंधेरीत भगवा फडकला, ऋतुजा लटके यांच्या विजयानंतर उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया

मुंबईएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाच्या उमेदवार ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला. या विजयानंतर ‘मशाल भडकली, भगवा फडकला’ अशी प्रतिक्रिया उद्धव ठाकरे यांनी दिली. रविवारी सायंकाळी (ता. ६) मतमोजणीनंतर पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी विजयी उमेदवार ऋतुजा लटके यांचीही उपस्थिती होती.

उद्धव म्हणाले की, “जनता आमच्यासोबत आहे हे आजच्या निकालाने स्पष्ट झाले. लढाईची सुरुवातच विजयाने झाली आहे. यापुढचेदेखील सर्व विजय आपण मिळवूच. आमचे नाव आणि चिन्ह गोठवले, परंतु ज्या निवडणुकीसाठी चिन्ह गोठवले ती निवडणूकच विरोधकांनी लढवली नाही. चिन्ह कुठले पण असो, जनता आमच्यासोबत आहे. पराभवाचा अंदाज आल्याने त्यांनी माघार घेतली. शिवाय ‘नोटा’ला जी मते पडली तीच मते विरोधकांना पडली असती, असा टोला उद्धव यांनी या वेळी भाजपसह शिंदे गटाला लगावला. अंधेरी पूर्व येथील आमदार रमेश लटके यांच्या निधनाने ही पोटनिवडणूक लागली होती. शिवसेना ठाकरे गटाने रमेश लटके यांच्या पत्नी ऋतुजा यांना उमेदवारी जाहीर केली होती. महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी आणि काँग्रेसने ऋतुजा लटके यांना पाठिंबा दिला होता. या पोटनिवडणुकीत लटकेंच्या नोकरीचा राजीनामा देण्यापासून, त्या शिंदे गटात जाणार असल्याच्या आफवांपर्यंत अनेक नाट्यमय घडामोडी घडल्या.

भाजपने या निवडणुकीसाठी मुरजी पटेल यांची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र, ऐनवेळी भाजपने उमेदवार माघारी घेतला. शिंदे गटाने निवडणूकीपूर्वीच भाजपला पाठिंबा दिला होता. काही अपक्षांनी अर्ज कायम ठेवल्याने ३ नोव्हेंबर रोजी मतदान पार पडले. त्यानंतर आज मतमोजणी झाली. यात ऋतुजा लटके यांनी विजय मिळवला.

हवेतले प्रकल्प महाराष्ट्रात : उद्धव ठाकरे यांनी या वेळी भाजपसह पंतप्रधान नरेंद्र मोदींवरदेखील टीका केली. “जमिनीवरचे प्रकल्प गुजरातला गेले आणि हवेतले प्रकल्प महाराष्ट्रात आले. आता गुजरातची निवडणूक जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रप्रेम उफाळून आले आहे. त्यांनी महाराष्ट्रासाठी काही हवेतील प्रकल्प देण्याची घोषणा केली.

चिन्ह कुठलेही असो, जनता आमच्या शिवसेनेसोबत असल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे हा विजय माझ्या पतीचा आहे, अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय हा विजय माझे पती रमेश लटके यांचा आहे. त्यांनी त्यांच्या पूर्ण राजकीय कारकीर्दीत जी जनसेवा केली त्याचीच पोचपावती म्हणजे हा विजय आहे. मतदारांनी त्याचीच परतफेड केली आहे, असे म्हणत उमेदवार ऋतुजा लटके यांनी सर्वांचे आभार मानले. रमेश लटके यांनी जी काही कामे हाती घेतली होती ती पूर्ण करणार आहे. अंधेरीचा विकास हेच माझे ध्येय आहे. हा विजय मविआचा आहे. मला उमेदवारी जेव्हा जाहीर झाली तेव्हापासून तिन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आहे. त्यांचे मी आभार मानते. त्या म्हणाल्या की, मला खंत आहे की, मला माझ्या पतीच्या जागेवर निवडणूक लढावी लागली. म्हणून जल्लोष होणार नाही, पण आम्हाला नवे पक्षचिन्ह मिळाले त्या चिन्हाखाली हा विजय आहे. त्याचा जल्लोष होईल.

भाजप नेते अॅड. आशिष शेलारांकडून लटकेंचे अभिनंदन भाजप नेते आशिष शेलार यांनी विजयानंतर ऋतुजा लटके यांचे अभिनंदन केले. तसेच भाजपाच्या मदतीमुळे विजय झाला, आम्ही निवडणूक झाली असती तर पराभव निश्चित होता, असे म्हणत सोशल मीडियावर शिवसेनेला टोला लगावला आहे. ते म्हणाले की, काँग्रेस, राष्ट्रवादी, भाकप, इतर डझनभर पक्षांनी पाठिंबा देऊन ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला ना मतदान जास्त झाले, ना मते जास्त मिळाली. भाजपाने निवडणूक लढवली असती तर यांचा पराभव निश्चित होता.

भाजपच्या तोडफोडीच्या राजकारणाला चोख उत्तर : पटोले महाविकास आघाडीच्या उमेदवार लटके यांचा विजय हा ईडी सरकारवर जनतेचा विश्वास नसल्याचे स्पष्ट करणारा आहे. या मतदारसंघात भाजपा व शिंदे गटाची ताकद नसतानाही निवडणूक लढवण्याचा अट्टाहास केला होता. आपला दारूण पराभव होत असल्याची चाहूल लागल्यानेच भाजपला निवडणुकीतून पळ काढावा लागला. महाविकास आघाडीवर विश्वास व्यक्त करत अंधेरीच्या जनतेने भाजपा व शिंदे गटाच्या तोडफोडीच्या राजकारणाला चपराक लगावल्याचे काँग्रेस नाना पटोले यांनी म्हटले आहे.

बातम्या आणखी आहेत...