आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अँटिलिया प्रकरण:अधिकाऱ्यांकडून गंभीर चुका झाल्या म्हणूनच पोलिस आयुक्तांची बदली! गृहमंत्री अनिल देशमुखांची कबुली

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबईतील पेडर रोडवरील एनआयएच्या कार्यालयात आणून ठेवलेल्या वाझेंच्या लक्झरी एसयूव्ही. - Divya Marathi
मुंबईतील पेडर रोडवरील एनआयएच्या कार्यालयात आणून ठेवलेल्या वाझेंच्या लक्झरी एसयूव्ही.

अँटिलियाप्रकरणी मुंबई पोलिस यंत्रणेतील काही अधिकाऱ्यांनी गंभीर चुका केल्याचा अहवाल मिळाल्याने मुंबईचे पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांची बदली करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली. वाझे प्रकरणामुळे अडचणीत आलेल्या महाविकास आघाडी सरकारकडून प्रथमच परमबीरसिंग यांच्या बदलीचे कारण सांगताना गृहमंत्र्यांनी ही जाहीर कबुली दिली.

एटीएस आणि एनआयए या दोन्ही यंत्रणा प्रोफेशनली हा तपास करीत असून चौकशीत बाधा येऊ नये, तो नि:पक्षपणे व्हावा या उद्देशाने परमबीरसिंग यांची बदली करण्यात आली असल्याचे देशमुख म्हणाले. काही अधिकाऱ्यांनी अक्षम्य आणि गंभीर चुका केल्याचे आतापर्यंतच्या तपासातून पुढे आले असल्याचे सांगून तपासातून जे समोर येेईल त्यानुसार कडक कारवाई करण्याची राज्य सरकारची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मनसुख हिरेनच्या संशयास्पद मृत्यूनंतर पहिल्या दिवसापासून संशयाच्या भोवऱ्यात राहिलेला सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझेला एटीएसने अटक केलेली नव्हती. एनआयएचा हा तपास वाझेचे थेट रिपोर्टिंग असलेले पोलिस आयुक्त परमबीरसिंग यांच्यापर्यंत पोहोचण्याची कुणकुण लागताच आघाडी सरकारला परमबीरसिंग यांची उचलबांगडी करावी लागली. त्याबाबत अधिकृत भूमिका प्रथमच समोर आली.

माझ्यावर अन्याय झाला; आयपीएस अधिकारी संजय पांडेंचे पत्र
परमबीरसिंग यांच्या बदलीचे तीव्र पडसाद पोलिस दलात उमटले आहेत. माझ्यावर नेहमीच अन्याय झाला. माझ्यापेक्षा ज्युुनियर अधिकाऱ्यांना वारंवार बढती देण्यात आली, असा आरोप आयपीएस अधिकारी संजय पांडे यांनी केला आहे. राज्य सुरक्षा महामंडळाच्या महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आल्यामुळे नाराज झालेल्या संजय पांडे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवले आहे. लाचलुचपत प्रतिबंधक (एसीबी)चे महासंचालकपद, मुंबई पोलिस आयुक्त आणि राज्याचे पोलिस महासंचालकपद यावर नियुक्त्या करताना माझ्या सेवाज्येष्ठतेकडे दुर्लक्ष करण्यात आले आणि कनिष्ठ अधिकाऱ्यांना नियुक्त्या देण्यात आल्या, असे पांडे यांनी म्हटले आहे.

निलंबित सहायक पोलिस निरीक्षक सचिन वाझे यांनी वापरलेली आणखी एक आलिशान कार राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी जप्त केली. सुमारे ५५ ते ६० लाख किमतीची टोयाेटा लँड क्रुझर प्राडो ही एसयूव्ही वाझे यांच्या ठाणे येथील ‘साकेत’ परिसरातील घराजवळ सापडली. ही चारचाकी एनआयएने पेडर रस्त्यावरील कंबाला हिलच्या एनआयए कार्यालयाच्या आवारात आणून उभी केली आहे. अँिटलिया प्रकरणात आतापर्यंत ५ लक्झरी गाड्या जप्त करण्यात आल्या असून यात स्काॅर्पिअो, इनोव्हा, प्राडो आणि २ मर्सिडीज यांचा समावेश आहे. एपीआय दर्जाचा अधिकारी एवढ्या लक्झरी कार कशासाठी वापरत असावा, याबाबत आता एनआयएलाच प्रश्न पडला आहे.

राजकीय सोय : परमबीरसिंग यांना मुंबई पोलिस आयुक्तपदावरून हटवताना इतर अधिकाऱ्यांनाही त्याची विनाकारण झळ बसल्याने पोलिस दलात नाराजी पसरली आहे. राजकीय सोयीसाठी पोलिस अधिकाऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची भावना दलामध्ये निर्माण झाली आहे.

मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडाल्यानेच
अँटिलिया स्फोटके प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या व्यापारी मनसुख हिरेन यांचा मृत्यू बुडूनच झाला असल्याचे डायटोम चाचणी अहवालात स्पष्ट झाले आहे. हिरेन यांचा मृतदेह मुंब्रा रेतीबंदर खाडी आढळला होता. याप्रकरणी राज्याचे दहशतवाद प्रतिबंधक पथक तपास करीत आहे. बुडून मृत्यू झालेल्या घटनांमध्ये डायटोम चाचणी अहवाल महत्त्वपूर्ण समजला जातो. हिरेन यांचा अहवाल आता हरियाणातील न्यायवैद्यक प्रयोग शाळेला पाठवण्यात आला आहे.

पोलिस महासंचालकपदाची सूत्रे रजनीश सेठ यांनी स्वीकारली
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक रजनीश सेठ यांनी गुरुवारी राज्याच्या पोलिस महासंचालकपदाच्या अतिरिक्त कार्यभाराची सूत्रे स्वीकारली. सन १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी असलेल्या सेठ यांची हेमंत नगराळे यांच्या जागी नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी नगराळे तत्काळ मुंबई पोलिस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला. मात्र परमबीरसिंग यांनी अद्याप गृहरक्षक दलाच्या प्रमुखपदाची सूत्रे स्वीकारलेली नाहीत.

बातम्या आणखी आहेत...