आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राष्ट्रवादीला दणका:मुख्यमंत्री ठाकरेंना अंधारात ठेवून केलेल्या उपायुक्तांच्या बदल्या रद्द

मुंबई2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • महाविकास आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर, गृहमंत्र्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांचा चाप‌?

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून २ जुलै रोजी मुंबईतील १० पोलिस उपायुक्तांच्या करण्यात आलेल्या बदल्या रविवारी गृह विभागाने तडकाफडकी रद्द केल्या. मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार गृह विभागाने या बदल्या रद्द केल्या, असे सांगितले जाते. मात्र, बदल्यांमागील राजकारणामुळे मुंबई पाेलिस दलात संभ्रम पसरला आहे. तसेच महाविकास आघाडीतील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

रविवारी सुटी असताना मुंबईचे सहपोलिस आयुक्त (प्रशासन) नवल बजाज यांनी बदली रद्दचे आदेश जारी केले. त्यात त्यांनी १० पोलिस उपायुक्तांनी नवीन ठिकाणचा पदभार सोडावा आणि पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावे, असे स्पष्ट केले आहे.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. या दहा पोलिस उपायुक्तांमध्ये बहुतांश आयपीएस आहेत. २ जुलै रोजीच्या बदल्यांची कल्पना मुख्यमंत्र्यांना नव्हती. शिवसेनेच्या नेत्यांनी त्यावर आक्षेप घेतल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी त्याला चाप लावल्याचे सांगितले जाते. गृहविभाग आणि मुख्यमंत्री कार्यालयाने संयुक्तपणे बदल्या रद्द केल्या आहेत, असे स्पष्टीकरण राष्ट्रवादीचे नेते व गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. मात्र, झालेल्या बदल्या या गृहमंत्र्यांच्या संमतीने झाल्याचे सांगितले जात आहे. दोन दिवसांपूर्वी शरद पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. तसेच, सरकारमध्ये समन्वय ठेवण्याची सूचना केली होती. त्या पार्श्वभूमीवर बदल्यांचा आदेश रद्द करण्यात आला आहे. या प्रकारामुळे सत्ताधारी आघाडी सरकारमधील मतभेद चव्हाट्यावर आले आहेत.

बदली झालेले उपायुक्त

बदली झालेल्या उपायुक्तांमध्ये परमजित दहिया, प्रशांत कदम, गणेश शिंदे, रश्मी करंदीकर, शहाजी उमाप, मोहन दहिकर, विशाल ठाकूर, संग्रामसिंह निशाणदार, प्रणय अशोक, नंदकुमार ठाकूर या अधिकाऱ्यांचा समावेश आहे. हे अधिकारी नेमणुकीच्या ठिकाणी रुजू झाले होते. आता त्यांना पुन्हा पूर्वीच्या ठिकाणी रुजू व्हावे लागणार आहे.

गृहमंत्र्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांचा चाप ‌?

दोन आठवड्यांपूर्वी नवी मुंबई आणि ठाणे महापालिकेतील आयुक्तांच्या बदल्यांनी असेच वादंग निर्माण झाले होते. दोन किमी परिसरात मुंबईतील नागरिकांनी खरेदी करावी, असा नियम मुख्यमंत्र्यांच्या संमतीने मुंबई आयुक्तांनी काढला होता. त्यावर गृहमंत्र्यांनी आक्षेप घेतला होता. त्यामुळे तो निर्णय रद्द करण्याची नामुष्की पोलिसांवर ओढावली होती. आता गृहमंत्र्यांच्या मनमानी कारभाराला मुख्यमंत्र्यांनी चाप लावला आहे, असे सांगितले जाते.

बातम्या आणखी आहेत...