आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अर्णब प्रकरणात ट्विस्ट:मुख्यमंत्री ठाकरेंच्या पत्नीने खरेदी केली अन्वय नाईक यांची कोकणातील जमीन; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा गौप्यस्फोट

मुंबई9 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि रश्मी ठाकरेंच्या नावे संयुक्त सातबारा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि शिवसेना नेते रवींद्र वायकर यांच्या कुटुंबीयांनी नाईक कुटुंबीयांकडून कोकणात जमीन खरेदी केल्याचा गौप्यस्फोट भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला. रिपब्लिक टीव्हीने पैसे थकवल्यामुळे अन्वय नाईक आणि त्यांच्या आईने आत्महत्या केल्याचा आरोप असून आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी अर्णब यांना अटक करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा आणि वास्तुविशारद अन्वय नाईक यांच्यात आर्थिक व्यवहार झाला होता. रायगड जिल्ह्यातील रेवदंडा किल्ल्यानजीक कोर्लई इथे रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी नाईक कुटुंबाकडून जमीन घेतली आहे. माझी सासुरवाडी तेथून जवळच आहे, त्यामुळे आपणाला त्याची माहिती आहे, असा दावा सोमय्या यांनी केला.

जमीन खरेदी व्यवहार २ काेटी २० लाखांचा, सन २०१४ मध्ये व्यवहार

२१ मार्च २०१४ रोजी ठाकरे परिवाराकडून या व्यवहारापोटी नाईक कुटुंबीयांना २ कोटी २० लाख रुपये देण्यात आले. उद्धव ठाकरे यांनी हा व्यवहार का लपवला? मुख्यमंत्र्यांनी रेवदंडाजवळ जमीन का घेतली? असे अजून किती व्यवहार झाले आहेत? त्याचबरोबर ठाकरे आणि नाईक कुटुंबात झालेल्या व्यवहाराची चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्या यांनी केली आहे.

ठाकरे-वायकर संयुक्त सातबारा

जमीन खरेदी व्यवहारातील सातबारा संयुक्त आहे. नाईक परिवाराचे आपण समजू शकतो, पण ठाकरे आणि वायकर या दोघांनी मिळून हा व्यवहार का केला? हे दोघे कसे एकत्र? अर्णब प्रकरण सध्या चर्चेत आहे. या प्रकरणात एवढी तत्परता दाखवण्यामागील कारण समोर यायला हवे, असे सोमय्या म्हणाले.

जमीन व्यवहाराचा निवडणूक प्रतिज्ञापत्रात उल्लेख

जमिनीचा व्यवहार उघड आहे. निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्याचा उल्लेख आहे. ठाकरे आणि नाईक यांचा काहीएक संबंध नाही. नाईक यांचा माझ्याशी संबंध आहे, जी चौकशी करायची ती करा, असे आव्हान शिवसेनेचे आमदार रवींद्र वायकर यांनी दिले आहे. तर पत्रकार अर्णब गोस्वामी यांना वाचवण्याकरिता मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप करत आहेत, असा प्रत्यारोप परिवहनमंत्री अनिल परब यांनी केला.

> वायकर आणि ठाकरे यांनी कोकणात संयुक्तपणे जमीन खरेदी केल्याचे यापूर्वी आरोप झालेले आहेत. मात्र ती जमीन अर्णब गोस्वामी प्रकरणात आत्महत्या केलेले अन्वय नाईक यांच्याकडून खरेदी केल्याचा दावा प्रथमच होतो आहे.

> सोमय्या यांनी मुंबई महापालिकेतील युती फिस्कटल्यानंतर उद्धव यांची ‘वांद्र्याचा माफिया’ अशा शब्दांत हेटाळणी केली होती. त्यानंतर सन २०१९ मध्ये सोमय्या यांचे लोकसभेचे तिकीट कापण्यात आले होते हे उल्लेखनीय.

बातम्या आणखी आहेत...