आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज पडसाद:दोन पावले पुढे; एक पाऊल मागे, मनसेच्या महाआरत्या रद्द, भोंग्यांबाबत राज ठाकरे आज भूमिका स्पष्ट करणार

मुंबई17 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोंग्यांबाबत आपली भूमिका मंगळवारी स्पष्ट करू, असे राज यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे. - Divya Marathi
भोंग्यांबाबत आपली भूमिका मंगळवारी स्पष्ट करू, असे राज यांनी सोशल मीडियावर जाहीर केले आहे.

औरंगाबादच्या बहुचर्चित सभेला २४ तासही उलटत नाहीत तोच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे एक पाऊल मागे आले आहेत. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी राज्यभरात महाआरती करण्याचे आदेश राज यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले होते. मात्र सोमवारी हा कार्यक्रम रद्द करण्यात आल्याची घोषणा त्यांनी केली आहे. मशिदींवरील भोंगे उतरवले नाही तर ४ तारखेपासून दुप्पट आवाजात हनुमान चालिसा लावण्याचा अल्टिमेटम यांनी राज ठाकरे यांनी रविवारच्या औरंगाबाद येथील सभेत दिला होता. परंतु भोंग्यांबाबत आपली भूमिका मंगळवारी स्पष्ट करू, असे राज यांनी जाहीर केले आहे. दरम्यान, औरंगाबाद येथील सभेत राज यांचे भाषण पोलिस ऐकतील, त्यानंतर त्यात आक्षेपार्ह आहे की नाही याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केले. भोंग्यांसंदर्भातील निर्णय हा काही राज ठाकरे यांनी घ्यायचा नाही. रविवारी झालेल्या सभेमध्ये राज ठाकरे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करणे आणि समाजा-समाजामध्ये भावना भडकतील याचाच प्रयत्न केला. औरंगाबादचे पोलीस आयुक्त सभेचा व्हिडिओ पाहतील. त्यात अटी-शर्तींचे कुठे, कुठे उल्लंघन झाले याचा आढावा घेतील. कायदेशीर सल्ला घेतील. त्याचा अहवाल वरिष्ठांना पाठवतील. त्यानंतर त्याबाबत पोलीस महासंचालक निर्णय घेतील, असे असे वळसे पाटील यांनी खोडद (ता. जुन्नर, जि. पुणे) येथे सांगितले.

औरंगाबादच्या सभेत... ४ तारखेनंतर ऐकणार नाही. एकदाच काय ते होऊन जाऊ द्या, अभी नहीं तो कभी नहीं
दुसऱ्या दिवशी ट्वीट... उद्या ईद आहे. अक्षय्य तृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका.

औरंगाबाद सभा | ४७ मिनिटांच्या भाषणात १५ मिनिटे पवारांवर डागली तोफ
३ तारखेला ईद आहे. मला मुस्लिमांच्या सणात कोणतेही विष कालवायचे नाही. ३ तारखेला ईद झाल्यानंतर देशभरातील हिंदू नागरिकांनी ज्या ठिकाणी भोंगे वाजतील त्या ठिकाणी दुप्पट आवाजात हनुमान चालिसा पठण केलेच पाहिजे. त्यासाठी पोलिसांची रीतसर परवानगी घ्या. ४ तारखेनंतर ऐकणार नाही. सरळ मार्गाने समजत नसेल तर पुढे महाराष्ट्रात काय होईल ते मला माहिती नाही. नाहीतर एकदाच काय ते होऊनच जाऊ द्या. अभी नहीं तो कभी नहीं.

भोंग्याचा विषय धार्मिक नव्हे सामाजिक
‘उद्या ईद आहे. कालच्या संभाजीनगरच्या सभेत त्या बाबतीत मी बोललो आहे. मुस्लिम समाजाचा हा सण आनंदाने साजरा व्हावा. आधी ठरल्याप्रमाणे अक्षयतृतीया या आपल्या सणाच्या दिवशी कुठेही आरत्या करू नका. आपल्याला कोणाच्याही सणात कोणतीही बाधा आणायची नाही. भोंग्यांचा विषय हा धार्मिक नसून, सामाजिक आहे आणि त्याबाबत आपण पुढे नेमकं काय करायचे, हे मी उद्या आपल्यासमोर मांडेन. तूर्तास एवढेच!,”

अजान.. : गोंगाट करणार असाल...
मशिदींवरचे भोंगे वाजवून कुणी गोंगाट करणार असाल तर आम्ही मशिदींसमोर हनुमान चालिसा पठण करणार. हा सामाजिक विषय आहे,धार्मिक नाही.

भोंगे : मी फक्त पर्याय दिला
भोंग्यांचा विषय अचानक आलेला नाही. अनेकांनी तो मांडलाय. मी फक्त पर्याय दिला. उ.प्र.त भोंगे उतरवले जाऊ शकतात तर महाराष्ट्रात ते का होऊ शकत नाही?

टोकाची भूमिका: ... होऊन जाऊ द्या
सरळ मार्गाने समजत नसेल तर महाराष्ट्रात पुढे काय होईल हे मला माहिती नाही. नाही तर एकदाच काय ते हो‌ऊन जाऊ द्या.अभी नहीं तो कभी नहीं. ४ तारखेनंतर ऐकणार नाही.

शरद पवार : जात पाहून बाेलतात
पुस्तकाचा लेखक कुठल्या जातीचा आहे याचा विचार करून पवार बोलतात. ते नास्तिक आहेत. खुद्द पवार यांच्या कन्येने ते नास्तिक असल्याचे लोकसभेत सांगितले.

जातीपाती : दुहीला राष्ट्रवादी जबाबदार
जात प्रत्येकाला प्रिय होती. दुसऱ्या जातीचा द्वेष राष्ट्रवादीच्या जन्मानंतर सुरू झाला.पवार जाती-जातीत भेद निर्माण करीत आहेत. त्यामुळे दुही माजते आहेत.

बातम्या आणखी आहेत...