आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासातारा जिल्ह्यातील शिवेंद्रसिंहराजे भोसले व उदयनराजे भोसले यांची राजकारणातील कुरबुर चव्हाट्यावर आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अवमानजनक वक्तव्य केले म्हणून उदयनराजेंनी आक्रमक भूमिका घेत मुंबईतील आझाद मैदानावर आंदोलनाची घोषणा केली. मात्र, उदयनराजेंच्या या आंदोलनाच्या हेतूवरच छत्रपती शिवरायांच्या साताऱ्याच्या राजघराण्यातील वंशज व भाजप आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शंका उपस्थित केली आहे.
राज्यपालांबाबत निर्णय दिल्लीत होतो
उदयनराजेंच्या आंदोलनामागे काही राजकीय स्वार्थ आहे का?, हेही तपासून पाहिले पाहीजे, अशी खोचक टीका शिवेंद्रसिंहराजे यांनी केली आहे. तसेच, राज्यपालांना हटवण्याचा निर्णय दिल्लीत होतो. त्यामुळे महाराष्ट्रात आंदोलन करण्याऐवजी दिल्लीत जाऊन आंदोलन करा, असा टोला शिवेंद्रसिंहराजे यांनी आपले चूलत बंधू व भाजप खासदार उदयनराजे यांना लगावला आहे.
सातारा नगरपालिकेने घरपट्टी संदर्भात नागरिकांना दिलेल्या नोटिसा मागे घ्याव्यात, या मागणीचे निवेदन मुख्याधिकारी व प्रशासक अभिजित बापट यांना देण्यासाठी आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले हे कार्यकर्त्यांच्यसमवेत सातारा नगर परिषदेत आले होते. निवेदन दिल्यानंतर ते पत्रकारांशी संवाद साधत होते.
आमचा फडणवीसांवर विश्वास
यावेळी खासदार उदयनराजे यांनी सुरू केलेल्या राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हटाव आंदोलना संदर्भात विचारले असता शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, मी स्वतः भगतसिंह कोश्यारी यांच्या विधानाचा निषेध केला आहे. आमचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर आमचा विश्वास आहे. त्यांनी यासंदर्भात लक्ष घालतो, असे सांगितले आहे. आता उदयनराजेंचा जर देवेंद्र फडणवीस यांच्यावर विश्वास नसेल तर या प्रश्नावर त्यांचे त्यांना माहीत.
राजकीय स्वार्थासाठी दबाव नको
शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजच नव्हेत तर कोणत्याही महापुरुषाबद्दल इतिहासाची मोडतोड करून कोणीही विधाने करू नयेत असेच आपले मत आहे. मात्र, राजकीय स्वार्थ साध्य होत नाही म्हणून असा पद्धतीने नेतृत्वावर दबाव टाकणे चुकीचे आहे. राजकारणात थोडे थांबण्याची तयारी पाहीजे. नेतृत्वावर विश्वास पाहीजे, असा टोला उदयनराजेंना शिवेंद्रसिंहराजेंनी लगावला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.