आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागपूर प्रन्यास सुधारच्या (एनआयटी) भूखंड प्रकरणी बेकायदा निर्णय केलेले असून त्यांच्या निर्णयावर उच्च न्यायालयाने ताशेरे मारले आहेत. राजा चुकला आहे, त्यांना आता मुख्यमंत्रिपदावरून बाजूला व्हावेच लागेल, आम्ही हे प्रकरण लावून धरणार आहोत, असा इशारा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला. मंगळवारी (२० डिसेंबर) उद्धव यांनी नागपुरातील हाॅटेल ब्ल्यू रॅडिसनमध्ये पत्रकार परिषद घेतली. त्यात ते बोलत हाेते.
उद्धव म्हणाले, “मुख्यमंत्र्यांचा निर्णय योग्य होता तर मग बदलला का? जर तुम्ही नियमबाह्य काम केले नाही, तर न्यायालयाने त्या निर्णयाला स्थगिती का दिली? तुमचे चुकले नाही म्हणता तर न्यायालय मित्राने राज्य सरकार प्रलंबित खटल्यात हस्तक्षेप करत आहे, असा मुद्दा का उपस्थित केला, अशा सवालांच्या फैरी उद्धव यांनी झाडल्या.
तुम्ही मुख्यमंत्री असताना तो निर्णय घेतला होता, हे पत्रकारांनी उद्धव यांच्या लक्षात आणून दिले. त्यावर उद्धव म्हणाले, मुख्यमंत्री कोणे होते हे महत्त्वाचे नाही. मंत्र्यांना न्यायालयाप्रमाणे सुनावणीचे अधिकार असतात. त्यामध्ये तत्कालीन नगरविकासमंत्री या नात्याने शिंदे यांनी निवाडा केला होता. हे प्रकरण गंभीर आहे, त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली. भूखडांचे प्रकरण म्हणजे ‘खोदा पहाड निकला चूहा’ असल्याचा दावा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर उद्धव म्हणाले, ठीक आहे, पहाड तो खोदा ना..पाणी कुठे तरी मुरले आहे, असे म्हणत, ‘तुम्ही सभागृहात काय उत्तर देता, न्यायालयात द्या’ असे आव्हान उद्धव यांनी सत्ताधाऱ्यांना दिले.
पुन्हा टोमणे : आमचा फडणवीस साइज मोर्चा
डिसेंबर १७ रोजी मुंबईत निघालेला महाविकास आघाडीचा मोर्चा नॅनो नव्हता तर तो फडणवीस साइज होता. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना थोडी तरी लाज असती तर त्यांनी स्वत:हून राजीनामा दिला असता. विमानतळाजवळील हॉटेलमध्ये पार पडलेल्या या पत्रकार परिषदेला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिल परब, सचिन अहिर उपस्थित हाेते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.