आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाविकास आघाडीच्या घटक पक्षांची आज संध्याकाळी विधिमंडळात बैठक होणार आहे. बैठकीस शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात यांसह मविआचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. अजित पवार यांनी याबाबत माहिती दिली.
विधिमंडळ अधिवेशनाचे आता जेमतेम 2 दिवस उरले आहेत. त्यामुळे अधिवेशनात विरोधकांची काय रणनीती असावी, सरकारला कसे कोंडीत पकडावे, यावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह अनेक महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.
उद्धव ठाकरेंची विधिमंडळात एन्ट्री
विधिमंडळात आज उद्धव ठाकरेंची एन्ट्री होणार आहे. त्यामुळे शिंदे गटातील आमदार व त्यांचा आमना-सामना होणार का? झाल्यास ठाकरे बंडखोरांना काय बोलणार किंवा बंडखोर ठाकरेंना कसे सामोरे जाणार, हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
याबाबत अजित पवार यांनी सांगितले, आम्ही सर्वांनी अडीच वर्षे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली काम केल्याचे उभ्या महाराष्ट्राने पाहिले. मात्र, राज्याच्या राजकारणात 20 जूनरोजी वेगळी घटना घडली. त्यामुळे राज्यात सत्तांतर झाले. या सत्तांतरानंतर आम्ही एकदा मातोश्रीवर जात उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती. आता पुन्हा अधिवेशन चालू असताना विधिमंडळात मविआची बैठक घेण्याची सुचना शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी केली होती. त्याला आम्ही होकार दिला. त्यानंतर उद्धव ठाकरे यांनाही बैठकीस उपस्थित राहण्याची विनंती केली. त्यांनीही आजच्या बैठकीस हजर राहणार असल्याचे सांगितले आहे.
विरोधकांची एकी दाखवण्याचा प्रयत्न
अजित पवार म्हणाले, विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होऊन आता एका आठवड्याचा कालावधी उलटला आहे. अधिवेशनाचे शेवटचे 2 दिवस बाकी आहेत. या काळात विरोधी पक्षांची एकी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहोत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.