आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

महाविकास आघाडीची बैठक:उद्धव ठाकरेंच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक ; शरद पवार म्हणाले- सरकारवर संकट नाहीच

मुंबईएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात.. : संजय राऊत

महाराष्ट्रात राजकारण तापलेले असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीच्या नेत्यांची आणि मंत्र्यांची बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडी सरकारचा भाग असलेले शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस अशा तिन्ही पक्षांचे नेते उपस्थित होते. भाजप खासदार नारायण राणे यांनी सोमवारीच राज्यपालांची भेट घेऊन राज्यात राष्ट्रपती राजवटीची मागणी केली. त्यानंतर शरद पवारांनी सुद्धा राज्यपालांची भेट घेऊन नव्या चर्चेला संधी दिली. या भेटीनंतर ते पहिल्यांदाच मातोश्रीवर गेले आणि ठाकरेंशी चर्चा केली. त्यातही देशातील सर्वाधिक कोरोनाग्रस्त महाराष्ट्रात असल्याने विरोधकांचा दबाव वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर ही बैठक महत्वाची आहे.

पवार म्हणाले- सरकार स्थिर, तिन्ही पक्ष एकत्रित

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सर्व चर्चांना विराम लावण्याचा प्रयत्न करताना हे सरकार स्थिर असल्याचा दावा केला. सरकारला कुठल्याही प्रकारचा धोका नाही. महाविकास आघाडी सरकार मजबुतीने उभे आहे. सध्या सरकारचे लक्ष कोरोना संकटावर आहे. राज्यपालांच्या भेटीबद्दल सांगावयाचे झाल्यास त्यांनीच मला चहापानासाठी बोलावले होते. यानंतर आपण स्वतःहून मातोश्रीवर जाउन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली. यात कोरोना आणि महाराष्ट्रातील सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली असेही पवारांनी स्पष्ट केले.

भाजपतील असंतुष्टांच्या अफवा : थोरात

कोरोनाच्या निमित्ताने भाजपची असंतुष्ट मंडळी सरकार अस्थिर असल्याच्या अफवा पसरवत आहेत. सरकारमधील तिन्ही पक्षांत पुरेसा समन्वय आहे. काही धुसफूस नाही. राष्ट्रपती राजवटीची चर्चा केवळ प्रसिद्धिमाध्यमांत आहे. भाजपने चालवलेल्या सरकार पाडण्याच्या कोणत्याही प्रयत्नांना यश येणार नाही,’ असा दावा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थाेरात यांनी केला.

सरकार स्थापण्याची कोणतीही घाई नाही

सध्याची परिस्थिती पाहता महाविकास आघाडी सरकार पाडून आमचे सरकार स्थापन करण्याची आम्हाला कसलीही घाई नाही. हे सरकार स्वतःच्याच ओझ्याने पडणार आहे. सत्ताधाऱ्यांमध्येच समन्वय नसल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे नेते एक तर राष्ट्रवादीचे नेते दुसरेच बोलतात, अशी टीका विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी व्हीसीद्वारे घेतलेल्या पत्रकार परिषदेत केली. ते म्हणाले, मी उद्धव ठाकरे यांचे मूल्यमापन करण्यासाठी इथे बसलेलो नाही, तो माझा अधिकारही नाही. पण राज्याला सध्या एका आश्वासक नेतृत्वाची गरज आहे. आम्हाला त्यांच्याकडून ठोस निर्णयांची अपेक्षा आहे. राहुल यांचे वक्तव्य म्हणजे अपयशाचे खापर शिवसेनेवर फोडण्याचा प्रयत्न असल्याचे ते म्हणाले.

मोदीही पवारांचे मार्गदर्शन घेतात.. : संजय राऊत

शरद पवार यांच्या मातोश्रीवरील बैठकीवरून गदारोळ होण्याचे, आश्चर्य वाटण्याचे कारण नाही. या बैठकीची माहिती माध्यमांना कळली नाही म्हणून ती गुप्त बैठक होती असे म्हटले जात आहे. विविध पक्षांचे नेतेच नव्हे तर स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदीही शरद पवारांशी चर्चा करतात, मार्गदर्शन घेतात. कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत आम्ही मार्गदर्शन घेतले असेल तर वाईट वाटण्याचे कारण नाही, असे शिवसेनेचे प्रवक्ते संजय राऊत म्हणाले.

राहुल गांधींचे वक्तव्य योग्य : मलिक

ठाकरे सरकारला काँग्रेसचा पाठिंबा आहे, पण मोठ्या निर्णयात महाराष्ट्रात काँग्रेसला स्थान नाही,’ असे वक्तव्य राहुल गांधी यांनी केल्याने काँग्रेस अस्वस्थ असल्याबाबत शिक्कामोर्तब झाले. दरम्यान, राहुल गांधी यांचे वक्तव्य योग्यच आहे, कारण महाराष्ट्रात काँग्रेसचे सरकार नाही तर महाविकास आघाडीचे सरकार आहे, असे राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले.

बातम्या आणखी आहेत...