आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्धव ठाकरेंचे सूचक वक्तव्य:'पुढील CM फडणवीसच', असे म्हणत बावनकुळेंनी फटाका फोडला आहे; फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल

एका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

नागपुरात देवेंद्र फडणवीस यांच्या तोंडावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितले की, 'आमचे पुढील मुख्यमंत्री तुम्हीच'. याचा अर्थ स्पष्टच की, मिंधे सरकारच्या पायाखालची सतरंजी ओढली जात आहे, असा दावा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

भाजप व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे राज्य सरकार व एकनाथ शिंदे यांच्या बाजूने लढत असल्याचा नुसता आव आणीत आहेत, असा आरोपही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था

आजच्या सामनाच्या अग्रलेखात उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे की, बावनकुळे हे शंभर टक्के फडणवीसनिष्ठ आहेत व फडणवीस यांना हवी तीच भूमिका ते घेतात. मग इतके मोठे विधान फडणवीस यांच्या मंजुरीशिवाय ते करतील काय? हाच प्रश्न आहे. नागपुरातील थंडीत राजकीय शेकोटीचा मिंधे गटाच्या पाठीला चटका बसला आहे. फेब्रुवारीपर्यंत बरेच काही घडेल. महाराष्ट्रातील औटघटकेची व्यवस्था डामाडौल आहे. बावनकुळे यांनी तसा फटाकाच फोडला आहे. भाजपच्या मनावरील दगड दूर करण्याचे काम सुरू झाले आहे

देवेंद्र फडणवीसांच्या मनातील इच्छा

उद्धव ठाकरे म्हणाले, भारतीय जनता पक्षाच्या मनातली वेदना अचानक उसळून ओठावर येते. ‘मी प्रदेश अध्यक्ष असेपर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत,’ अशी इच्छा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली आहे. चंद्रशेखर बावनकुळे हे देवेंद्र फडणवीस पुरस्कृत पक्षाध्यक्ष आहेत. इतके मोठे विधान बावनकुळे स्वतःच्या मनमर्जीने करणार नाहीत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्या मनातली इच्छा चंद्रशेखर बावनकुळेंच्या मुखातून बाहेर पडली, असे मानायला जागा आहे.

फडणवीस सहकाऱ्यांच्या मनात खळबळ

उद्धव ठाकरे म्हणाले, नागपुरात विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्याच्या पूर्वसंध्येला भाजपच्या प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे प्रत्यक्ष नागपुरातच ‘पुढचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस’ अशी भूमिका घेऊन खळबळ उडवून दिली आहे. दुसरे असे की, पूर्व नागपुरात संत जगनाडे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमात बावनकुळे बोलले त्या व्यासपीठावर स्वतः देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या विधानानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर मिश्किल हास्य उमटले व ते खूश झाल्याचे भाव सभागृहातील लोकांनी टिपले. चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात, ‘2014 ते 2019 चा काळ पुन्हा महाराष्ट्रात आला पाहिजे. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत हीच स्थिती पुन्हा निर्माण व्हावी.’ म्हणजे देवेंद्र फडणवीस यांनी बारा तासांपूर्वी जे एक विधान केले होते ते काही खरे नव्हते, असाच चंद्रशेखर बावनकुळे यांच्या म्हणण्याचा अर्थ. ‘महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आहेत व राहतील, आम्ही सर्व एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखाली ‘उप’ म्हणून काम करू.’ हे देवेंद्र फडणवीस यांचे विधान व त्यांच्या प्रांताध्यक्षांचे विधान यात जमीन-अस्मानाचा फरक आहे. देवेंद्र फडणवीस व त्यांच्या सहकाऱ्यांच्या मनात काय खळबळ आहे. ते चंद्रशेखर बावनकुळेंनी स्पष्ट केले.

चंद्रकांत पाटलांचे वक्तव्य

उद्धव ठाकरे म्हणाले, चंद्रकांत पाटील यांनीही चार महिन्यांपूर्वी वेगळे काय सांगितले होते? ‘एकनाथ शिंदे यांना मनावर दगड ठेवून मुख्यमंत्री केले.’ हे चंद्रखांत पाटील यांचे विधान व आताचे चंद्रशेखर बावनकुळे यांचे बोलणे लक्षवेधी आहे. भाजपच्या मनावरील दगड बाजूला करण्याचे काम सुरू झालेले दिसते व फडणवीस त्या कामी कामाला लागले आहेत. हा दगड छाताडावर ठेवून किती काळ काम करायचे? हा प्रश्न भाजप परिवारासही पडलाच आहे. फडणवीस यांचा हक्क असताना एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करणे ही तडजोड होती. फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदी शपथ घेण्यासाठी कोट चढवलाच होता, पण दिल्लीच्या आदेशाने होत्याचे नव्हते झाले. फडणवीसांनी शिंदे गटाच्या हाताखाली काम करणे म्हणजे सिंहाने कोल्ह्यांच्या झुंडीचे ‘राज्यपद’ मान्य करण्यासारखे आहे. याची टोचणी फडणवीस यांच्या मनास असणारच.

घोडा सजवला पण...

उद्धव ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे यांच्याबरोबर 50 लोक गेले हा भ्रम आहे. त्यांच्याबरोबर फार तर सात-आठच आमदार गेले. बाकीच्यांना देवेंद्र फडणवीस यांनीच फितवून, धमकावून पाठवले असे म्हणतात. त्या कामी केंद्रीय तपास यंत्रणा, प्रलोभने, खोके वगैरेंचा वापर झाला. देवेंद्र फडणवीस यांनी घोडा सजवला स्वतःसाठी, पण घोड्यावर टपकन जाऊन बसले दुसरेच कोणी. असे काही घडेल हे देवेंद्र फडणवीस यांच्या ध्यानीमनीही नसावे. देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या लोकांनी हायकमांडच्या आदेशाने माघार घेतली हे खरे, पण अपमानाच्या जखमा भळाभळा वाहत आहेत हीदेखील वस्तुस्थितीच आहे. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या वक्तव्याने ते स्पष्टच झाले.

एकनाथ शिंदे काय भूमिका घेणार?

सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षा आहे व सर्व काही संविधान, कायद्याने घडले तर हे सरकार फेब्रुवारी महिना पाहणार नाही, असा विश्वासही उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केला. उद्धव ठाकरे म्हणाले, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच आमदार म्हणून अपात्र ठरतील, पण केंद्रीय यंत्रणांचा वापर मनमर्जीने करून बेइमानांना वाचवले जात आहे. तरीही बेइमानी फार काळ टिकेल असे दिसत नाही. देवेंद्र फडणवीस हे किती काळ महाराष्ट्रात ‘डेप्युटी’ म्हणजे ‘उप’ राहणार? कालपर्यंत ते राज्याचे ‘मुख्य’ होते, बाकी सारे त्यांचे डेप्युटी होते. आज देवेंद्र फडणवीस त्याच डेप्युटीच्या हाताखाली काम करीत आहेत व चंद्रशेखर बावनकुळे वगैरेंना हे मान्य नाही. उद्धव ठाकरे म्हणाले, देवेंद्र फडणवीस यांनी घडवलेला व बिघडवलेला मोठा कंपू भाजपात आहे. त्या सगळय़ांच्या वतीने चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीस, अशी गर्जना केली. आता ‘मिंधे’ गटाचे आमदार व प्रवक्ते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या गर्जनेवर काय भूमिका घेणार?, असा सवालही उद्धव ठाकरे यांनी केला आहे.

बातम्या आणखी आहेत...