आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानैतिकतेला धरुन मी राजीनामा दिला. आता बेकायदेशीर सरकारने आपला राजीनामा द्यावा. आणि पुन्हा एकदा निवडणुकांना सामोरे जाऊयात. जनता सर्वोच्च आहे. त्यांचा कौल स्विकारुया, असे म्हणत ठाकरे गटाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना निवडणुकांना सामोरे जाण्याचे आवाहन केले आहे.
राज्यासह संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा अंतिम निकाल गुरुवारी समोर आला आहे. तत्कालीन उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांनी अपात्र ठरवलेल्या 16 आमदारांबाबत सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय दिला आहे. सुप्रीम कोर्टाने हे प्रकरण विधानसभा अध्यक्षांकडे सोपवले आहे. आता विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या आमदारांचा निर्णय घेतील. या निकालावर उद्धव ठाकरेंनी आज पुन्हा एकदा पत्रकार परिषद घेत सविस्तर भाष्य केले आहे.
उद्धव ठाकरे पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले, आज सकाळी रस्ता चुकल्यासारखे वाटत असेल. मी आज शिर्डीला जात आहे. महाराष्ट्रात बेबंदशाही माजवण्याचा जो काही प्रकार सुरु आहे. त्याला कुठेतरी चाप बसायला हवा. यावर सविस्तर बोलण्यासाठी आजच्या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आल्याचे उद्धव ठाकरे यांनी सांगितले.
गद्दारांनी आनंदोत्सव का साजरा केला?
उद्धव ठाकरे म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंनी जपलेली शिवसेना गद्दारांच्या माध्यमातून दावणीला बांधली ती भाजपने. काल काहींनी आनंदोत्सव साजरा केला. भाजपला डोईजड झालेले ओझे उतरवण्याचा मार्ग मिळाला म्हणून त्यांनी आनंद साजरा केला. मात्र गद्दारांनी का आनंदोत्सव साजरा केला, हे कळलेले नाही.
हिंदुत्वाचे धिंडवडे निघू नये
उद्धव ठाकरे म्हणाले, सर्वोच्च न्यायालयाने सरळ सांगितले आहे की पोपट मेलेला आहे. आता ते जाहिर करण्याचे काम अध्यक्षांवर सोपवले आहे. जगात महाराष्ट्राची अवहेलना सुरु आहे. त्यामुळे मी पंतप्रधान मोदींना आवाहन करेल की, देशात अशाप्रकारचा नंगानाच सुरु असून यातून आपली देखील बदनामी होत आहे. त्यांना चाप लावा. हिंदुत्वाचे धिंडवडे निघू नये.
लवकरात लवकर निकाल लावा
उद्धव ठाकरे म्हणाले, मी राजीनामा दिला नसता तर मला पुन्हा मुख्यमंत्री होता आले असते. मात्र मला यात स्वारस्य नाही. नैतिकतेला जागून मी राजीनामा दिला. सरकार बेकायदेशीर आहे त्यांनी देखील आता राजीनामा द्यावा. काही जण मेलेला पोपट हातात घेऊन मिठुमिठु करत आहेत. अध्यक्ष त्यांच्या परिने निर्णय घेतीलच. ते सध्या परदेशात आहेत. लवकरात लवकर येऊन त्यांनी निकाल लावावा.
संबंधित वृत्त
टीका:शिंदे गटाचे अंतर्वस्त्र सर्वोच्च न्यायालयाने उतरवले, देशात संविधान जिवंत; न्याय अजून मेलेला नाही, ठाकरे गटाचे भाष्य
एकूणच ठाकरे सरकार पाडण्यासाठीची सर्व प्रक्रिया नियमबाह्य असल्याचे कोर्टाच्या निकालात अधोरेखित झाले. पण बहुमत चाचणीला सामोरे न जाता उद्धव ठाकरेंनी स्वखुशीने मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यामुळे घड्याळाचे काटे उलटे फिरवता येणे आता अशक्य असल्याचे कोर्टाने स्पष्ट केले. कालच्या निकालावर ठाकरे गटाने भाष्य केले आहे. वाचा सविस्तर
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.