आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामहाराष्ट्रात अभूतपूर्व राजकीय संकट सुरू असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे केंद्रीय तपास यंत्रणांच्या निशाण्यावर आले आहेत. रायगडमधील मुरुड तालुक्यात मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरेंच्या नावे असलेल्या मालमत्तेच्या चौकशीसाठी भाजप नेते किरीट सोमय्या यांनी मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने याचिका स्वीकारली आहे. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख निश्चित झालेली नाही.
याचिकेत उद्धव ठाकरेंशिवाय आणखी तीन जणांची नावे
याचिकेत उद्धव ठाकरे यांच्याशिवाय त्यांच्या पत्नी रश्मी, शिवसेना आमदार रवींद्र वायकर आणि त्यांच्या पत्नी मनीषा वायकर यांना पक्षकार करण्यात आले आहे. सोमय्या यांच्या याचिकेनुसार ही मालमत्ता मुख्यमंत्री ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि शिवसेना आमदार रवींद्र वायकर यांच्या पत्नी मनीषा वायकर यांनी मिळून रायगडमधील मुरुड तालुक्यातून खरेदी केली होती.
अलिबागमधील मालमत्तेच्या चौकशीची मागणी
या मालमत्तेची पर्यावरण मंत्रालयाकडून चौकशी करण्याची मागणी भाजप नेत्याने केली आहे. याशिवाय, त्यांनी अलिबागमधील मालमत्तेसंदर्भात मुख्यमंत्री ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांनी केलेल्या कथित 'बेकायदेशीर' कृत्यांची अंमलबजावणी संचालनालय (ईडी) आणि इतर यंत्रणांकडून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
दोन कोटींना मालमत्ता खरेदी करून 10 लाख दिल्याचा आरोप
याचिकेनुसार, रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी मालक अन्वय नाईक यांच्याकडून वादग्रस्त मालमत्ता 2 कोटी रुपयांना विकत घेतली होती, त्यापैकी केवळ 10 लाख रुपये दिले गेले. सोमय्या यांच्या मते, 'हे प्राप्तिकर कायद्याच्या कलम 1961 (269)ST चे उल्लंघन आहे.'
संपत्तीचा तपशील लपवल्याचा उद्धव ठाकरेंवर आरोप
सोमय्या यांनी याचिकेत उद्धव ठाकरे आणि आमदार रवींद्र वायकर यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात मालमत्तेवरील बांधकाम लपवून त्यांचे अवमूल्यन केल्याचे म्हटले आहे. हे लोकप्रतिनिधी कायदा, 1951च्या तरतुदींचे उल्लंघन आहे. सोमय्या यांनी तपास अहवाल न्यायालयासमोर सादर करण्याची मागणी केली आहे. यासोबतच मालमत्तेची स्थिती, त्यातील बांधकाम आणि पेमेंट पद्धतीची चौकशी करण्यास सांगितले आहे. सोमय्या म्हणाले की, ग्रामपंचायतीने जारी केलेल्या मालमत्ता कराच्या पावतीवरून हे सिद्ध होते की जमिनीवर बांधकाम केले जात आहे.
बांधकामादरम्यान पर्यावरणीय नियमांचे उल्लंघन
सोमय्या यांनी दावा केला की, जमिनीवरील बांधकाम पाहता त्यासाठी कोणतीही परवानगी घेतली नसल्याचे दिसते. त्यांच्या म्हणण्यानुसार ही मालमत्ता तटीय नियमांचे उल्लंघन करून बांधण्यात आली आहे. हे समुद्रकिनाऱ्यापासून 100 मीटरच्या आत आहे. सोमय्या यांनी दावा केला की, कथित मालमत्ता आरक्षित वनक्षेत्रात येते आणि रश्मी ठाकरे आणि मनीषा वायकर यांनी तिच्या बांधकामासाठी पर्यावरण किंवा वन विभागाकडून कोणतीही मंजुरी घेतलेली नाही.
उद्धव ठाकरेंच्या मेहुण्याचे 11 फ्लॅट सील
यापूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांच्या कंपनीचे 11 फ्लॅटही सील करण्यात आले आहेत. ही मालमत्ता सुमारे 6.45 कोटींची असल्याचे सांगितले जात आहे. श्रीधर पाटणकर हे रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. पुष्पक बुलियन कंपनी गैरव्यवहार प्रकरणात पीएमएलए कायद्यांतर्गत ईडीने ही कारवाई केली आहे. श्रीधर पाटणकर यांच्या नंद किशोर चतुर्वेदी नावाच्या व्यक्तीसोबतच्या संशयास्पद आर्थिक व्यवहारात ही कारवाई करण्यात आली.
नंद किशोर चतुर्वेदी यांच्यावर पुष्पक बुलियन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या आर्थिक गैरव्यवहारात आरोपी महेश पटेल आणि चंद्रकांत पटेल यांचे भागीदार असल्याचा आरोप आहे. ईडीने 2017 मध्ये मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात दोघांवर कारवाई केली होती.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.