आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मुंबईवर 'लक्ष’:सेनेवर 'विकासविरोधी’ शिक्का बसण्याची उद्धव ठाकरेंना भीती, रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री लागले कामाला

मुंबई4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेची होऊ शकते गोची

मेट्रो प्रकल्पाच्या कारशेडचे भिजत घोंगडे, बुलेट ट्रेनच्या जमीन संपादनाचे मंदगतीने काम आणि वाढवण बंदराला स्थानिक शिवसेना नेत्यांचा विरोध यामुळे शिवसेनेवर विकासविरोधी शिक्का बसण्याची शक्यता आहे. परिणामी, हा प्रतिगामी शिक्का आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत शिवसेनेला चांगलाच महागात पडू शकणारा आहे. म्हणून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जाेमाने कामाला लागले असून रखडलेल्या प्रकल्पांत तोडग्यासाठी ते सरसावले आहेत.

२०२२ च्या फेब्रुवारी मध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुका होत आहेत. पालिकेचा अर्थसंकल्प ३० हजार कोटींचा असून गेली २५ वर्षे सेनेची पालिकेवर सत्ता आहे. या वेळी सेना-भाजप प्रथमच पालिका निवडणुकीत आमने-सामने येत आहेत. मुंबईत मराठी मतदार अवघा २७ टक्के राहिला आहे. परिणामी, मुंबईतील उच्च व उच्च मध्यमवर्गीयांना काॅस्मो मतदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी गोरेगाव येथील आरे जंगलातून मेट्रो कारशेड कांजूरला नेला. पण, केंद्राने हस्तक्षेप केल्याने कांजूरचा प्रकल्प रखडला आहे. राज्याचा मेट्रो प्रकल्प अडवल्याने शिवसेनेने केंद्राचा बुलेट ट्रेन प्रकल्प अडवण्याचा सूचक इशारा दिला आहे. या दोन्ही प्रकल्पांच्या रखडण्याला शिवसेना जबाबदार असल्याचे कथानक भाजपच्या प्रचार यंत्रणांनी प्रसवले आहे. त्यात पालघर जिल्ह्यातील डहाणूजवळच्या वाढवण बंदराला स्थानिक शिवसेना नेत्यांनी विरोध चालवला आहे. तळ कोकणातील नाणार तेलशुद्धीकरण प्रकल्प यापूर्वी शिवसेनेने रद्द केला आहे.

या पार्श्वभूमीवर शिवसेनेची विकासविरोधी अशी प्रतिमा तयार केली जात आहे. त्यात मुंबई महापालिकेच्या निवडणुका अगदी तोंडावर आहेत. त्यामध्ये शिवसेना विकासविरोधी असल्याचा भाजप प्रचार करू शकते. तसे झाल्यास विकासाबाबत आग्रही असलेला मुंबईतील उच्च व मध्यमवर्गीय मतदार शिवसेनेच्या मागे कदापि येणार नाही. दरम्यान, भाजपने देखील महापालिका निवडणुकीची तयारी सुरू केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. तसेच राष्ट्रवादी आणि काँग्रेसने देखील निवडणुकीसाठी कंबर कसली आहे.

केंद्र सरकारशी नमते घेण्याची भूमिका
हा धोका लक्षात येताच मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सतर्क झाले आहेत. त्यांनी प्रकल्पांच्या कामांवर लक्ष केंद्रित केले आहे. त्याचाच भाग म्हणून त्यांनी सागरी किनारा रस्त्याच्या कामांची तसेच मेट्रो प्रकल्पांच्या कामांची पाहणी केली. कोरोना निमित्ताने जनसंवाद साधताना त्यांनी शिवसेना शाश्वत विकासासाठी आग्रही असल्याची ठाम ग्वाही जाणीवपूर्वक दिली. वाढवण बंदर, बुलेट ट्रेन आणि मेट्रो कारशेड प्रकल्पाची रखडलेली कामे लवकरात लवकर मार्गी लावण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. तसेच केंद्र सरकारशी संघर्ष न करता रखडलेले प्रकल्प मार्गी लावण्यासाठी मध्यममार्गी भूमिका घेण्यास उद्धव ठाकरे तयार झाले असल्याचे सांगण्यात येते.

बातम्या आणखी आहेत...